ऑस्ट्रेलियात पुण्याच्या आराध्या शिंदेची सुवर्णकामगिरी

वुशू कुंग फूमध्ये भारताला मिळवून दिले सुवर्णपदक

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
पुणे
Aradhya Shinde पुण्याच्या आराध्या शिंदे हिने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे नुकत्याच पार पडलेल्या HYX ओशनिया आंतरराष्ट्रीय निमंत्रित वुशू कुंग फू अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये आराध्याने उत्कृष्ट प्रदर्शन करत Quanshu (Spear) प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशामुळे पुण्यासह संपूर्ण देशाचा गौरव वाढला असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 

 
Aradhya Shinde, Wushu Champion India,
21 ते 25 मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत ओशनिया प्रदेशातील 11 देशांतील नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. चुरशीच्या आणि उच्च दर्जाच्या स्पर्धेत आराध्याने आपल्या तांत्रिक कौशल्य, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकावर नाव कोरले. तिच्या या यशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय तिरंगा अभिमानाने फडकला.
 
 
आराध्याचा क्रीडा Aradhya Shinde प्रवासही प्रेरणादायी ठरला आहे. गेल्या पाच वर्षांपासून ती पुण्यातील एस.के. क्रीडा प्रतिष्ठानमध्ये वुशूचे प्रशिक्षण घेत आहे. सुरुवातीला तिच्या आई-वडिलांनी केवळ शारीरिक तंदुरुस्ती आणि फिटनेससाठी तिला या खेळात सहभागी करून घेतले होते. मात्र कालांतराने आराध्याला वुशूची विशेष आवड निर्माण झाली आणि तिने या खेळात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्धार केला.विशेषतः वेपन इव्हेंट प्रकारातील विविध तंत्रे आत्मसात करण्यासाठी तिने सातत्याने मेहनत घेतली. नवीन शस्त्रप्रकार शिकण्याची उत्सुकता आणि कौशल्य विकसित करण्याची जिद्द यामुळे तिची प्रगती झपाट्याने झाली. 2021 पासून वुशू खेळण्यास सुरुवात केलेल्या आराध्याने अल्पावधीतच जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.याशिवाय खेलो इंडिया महिला लीगसह विविध स्पर्धांमध्ये तिने अनेक पदके जिंकत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदकामुळे तिच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
 
 
आराध्याच्या या यशामुळे Aradhya Shinde पुण्यातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून भविष्यातही ती भारतासाठी अशाच प्रकारे यश मिळवत राहील, असा विश्वास तिचे प्रशिक्षक, कुटुंबीय आणि क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे. तिची ही कामगिरी राज्यातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरत आहे.