सिंदी (रेल्वे)/सेलू,
Auction of Sesame and Groundnuts कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी अंतर्गत येत असलेल्या सेलू उपशाखेत यावर्षी शेतकर्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. सेलू उपबाजार आवारात शनिवार ६ जून पासून तीळ शेतमाल लिलावासह आता सोमवार ८ जून पासून भुईमूग शेतमालाच्या लिलावाचाही शुभारंभ करण्यात येत आहे. या दोन्ही प्रमुख नगदी पिकांच्या खरेदीमुळे परिसरातील शेतकर्यांत उत्साहाचे वातावरण आहे. बाजार समितीच्या नियोजनानुसार, तीळ आणि भुईमूग या दोन्ही शेतमालांची लिलाव प्रक्रिया सध्या आठवड्यातून केवळ एकच दिवस (दर शनिवारी तीळ आणि दर सोमवार भुईमुग) सेलू शाखेतील कापूस यार्ड व गोदाम क्रमांक १ मध्ये पार पडणार आहे. सेलू आणि परिसरातील कार्यक्षेत्रात तीळ आणि भुईमुगाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, स्थानिक पातळीवर हकाची शासकीय किंवा अधिकृत बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकर्यांना माल विक्रीसाठी यवतमाळ व इतर ठिकाणच्या खाजगी बाजारात जावे लागत होते. यात शेतकर्यांचा वेळ, श्रम आणि वाहतुकीचा मोठा खर्च होत होता.
शेतकर्यांची ही अडचण ओळखून बाजार समितीचे सभापती केशरीचंद खंगारे यांनी मागीलवर्षी पासून प्रथम तिळाच्या लिलावाची व्यवस्था केली होती. याला व्यापार्यांनी योग्य भाव देऊन उत्तम प्रतिसाद दिला. याच धर्तीवर यंदा शेतकर्यांच्या मागणीनुसार भुईमुगाचाही लिलाव सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यंदा या दोन्ही शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असल्याने हा निर्णय शेतकर्यांसाठी वरदान ठरणार आहे. सेलू उपशाखेत सुरू होणार्या तीळ व भुईमूग लिलाव प्रक्रियेचा परिसरातील सर्व उत्पादक शेतकर्यांनी लाभ घ्यावा, शेतकर्यांनी आपला शेतमाल चांगला वाळवून आणि स्वच्छ करून लिलावासाठी आणावा, जेणेकरून मालाला जास्तीत जास्त भाव मिळवता येईल, असे आवाहन बाजार समितीचे सभापती केशरीचंद खंगारे, उपसभापती प्रमोद आदमने, सचिव महेंद्र भांडारकर तसेच समस्त संचालक मंडळ आणि बाजार समितीच्या कर्मचार्यांनी केले आहे.