विप्लव बाजोरिया यांना दिलासा नाहीच

-उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली -विधान परिषदेची अमरावती निवडणूक

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
अमरावती, 
biplav-bajoria : विधान परिषदच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा नामांकन अर्ज काल अवैध ठरवून बाद करण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकार्‍याच्या या निर्णयाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. बुधारी दुपारी झालेल्या सुनावनीत विप्लव यांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार देऊन त्यांची याचिका फेटाळून लावली.
 
 
k
 
 
 
नामांकन अर्ज अवैध ठरविलेल्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर विप्लव व त्यांचे वडील गोपिकीशन बाजोरिया यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्या. प्रफुल्ल कुंभलकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दुसर्‍या बाजुने निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रवीण पोटे, हर्षजीत देशमुख व प्रशांत महल्ले यांनी न्यायालयात कॅवेट दाखल केले होते. दोन्ही बाजुंचा सविस्तर युक्तीवाद झाला. बाजोरिया यांची बाजू अ‍ॅड. रेणूका शिरपूरकर यांनी मांडली तर पोटे यांच्याकडून अ‍ॅड. सुनील मनोहर यांनी बाजू मांडली. त्यांना अमरावतीच्या अ‍ॅड. प्रशांत महल्ले, अ‍ॅड. चंद्रकांत डोरले, अ‍ॅड. संदीप गुप्ता, अ‍ॅड. रोहित उपाध्याय, अ‍ॅड. सुमित शर्मा यांनी सहकार्य केले. हर्षजीत यांच्याकडून अ‍ॅड. भांगडे तर महल्ले यांच्याकडून ऋषिकेश मारर्डीकर यांनी युक्तीवाद केला. अखेर न्यायालयाने विप्लव बाजोरिया यांना दिलासा देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळली.
 
 
//अमरावतीत गुन्हा दाखल
 
 
अमरावतीच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या निकालाची प्रत विप्लव व गोपिकीशन बाजोरिया निर्णयाची प्रत मागायला मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. तेव्हा त्यांनी वाद घालत आक्षेपार्ह भाषा वापरली तसेच प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यात आल्याचा आरोप प्रशासनाने केला. या घटनेनंतर निवासी जिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे मंगळवारी रात्री १ वाजता बाजोरिया पिता-पुत्रावर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आमच्यासमोर जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप बाजोरिया यांनी केला.
 
सर्वोच्च न्यायालयात जाणार
 
 
उच्च न्यायालयाने विप्लव बाजोरिया यांची आव्हान याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला. विप्लव व त्यांचे वडील लगेच दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.