प्रयागराज,
bodies found in a house in Prayagraj प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दक्षिण मलका परिसरातील हायगेट रोडवरील एका घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तीन मृतदेह आढळून आले. पुढील तपासात त्याच इमारतीच्या तळमजल्यावरील एका दुकानातून आणखी एक मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या चार झाली. प्राथमिक तपासानुसार हे मृतदेह दोन ते तीन दिवसांपूर्वीचे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मृतदेहांवर जखमांच्या खुणा आढळल्याने हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्येचा प्रकार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतांची ओळख वीरेंद्र वैश (७०), त्यांची पत्नी अनिता (६५), मुलगी मीनाक्षी (४५) आणि मुलगा अभिषेक (४०) अशी पटली आहे.या घटनेनंतर पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून संपूर्ण घराची तपासणी सुरू केली आहे. परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कुटुंबातील मालमत्तेचा वाद किंवा अंतर्गत कौटुंबिक तणाव यामागे कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मृत व्यक्ती वीरेंद्र वैश यांचे दोन मुलगे असल्याचे समोर आले असून त्यापैकी एकाला पूर्वी कुटुंबातून दूर करण्यात आले होते, अशीही माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास खुनाच्या दृष्टिकोनातून सुरू केला असून, घटनास्थळावरील पुरावे आणि पोस्टमॉर्टेम अहवालानंतरच या भीषण घटनेचे नेमके सत्य स्पष्ट होणार आहे.