बोपाबोडीतील दोन बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
गोंदिया,
child-marriage : सडक अर्जुनी तालुक्याच्या बोपाबोडी येथे 29 मे रोजी नियोजित करण्यात आलेले दोन बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे.
 
 
hh
 
 
 
डुग्गीपार पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलिस अधीक्षक गोरख भामरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांच्या नेतृत्वात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, इंडियन सोशल वेलफेयर सोसायटीचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले, दामिनी पथक आणि डुग्गीपार पोलिसांच्या संयुक्त पथकाने वेळीच हस्तक्षेप केल्याने होणारे बालविवाह थांबविण्यात आले. डुग्गीपारचे पोलिस निरीक्षक निर्वाण आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षातील संरक्षण अधिकारी मुकेश पटले यांनी स्थानिक पातळीवर माहिती गोळा करून प्रशासनाला वेळीच सतर्क केले. बोपाबोडी येथील ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांच्याकडून अल्पवयीन बालकांचे वयाचे पुरावे प्राप्त करून घेण्यात आले.
 
 
प्राप्त कागदपत्रांच्या अनुषंगाने दोन्ही बालकांचे वय बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार कमी असल्याचे दिसून आले. बाल कल्याण समितीच्या सदस्य जयश्री कापगते आणि समुपदेशक पूजा डोंगरे यांनी होऊ घातलेल्या बालविवाहातील दोन्ही कुटुंबियांशी संवाद साधला. पथकाने विवाहस्थळी पोहोचून वर-वधू पक्षाच्या कुटुंबाला ग्रामपंचायत कार्यालयात बोलाविले. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्राम बाल संरक्षण समितीचे इतर सदस्य यांच्या समक्ष बालविवाहाचे दुष्परिणाम व कायदेशिर शिक्षेची तरतूद समजावून सांगितली. मुलीचे वय 18 वर्षे व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे लेखी हमीपत्र पालकांकडून लिहून घेण्यात आले.