गोंदिया,
burglary-theft-accused-apprehended : देवरी शहरात चोरी व घरफोडी करण्याचा प्रयत्न करणार्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात देवरी पोलिसांना यश आले असून तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात 10 आरोपींना अटक केली आहे. त्यातच गुन्ह्यात वापरलेल्या 15 लाख रुपये किमतीची तीन चारचाकी वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 मे रोजी उषा नरेश शहारे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, 23 मे रोजी मध्यरात्री अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराची आवार भिंत ओलांडून घरात प्रवेश केला आणि घर फोडण्याचा प्रयत्न केला होता. या तक्रारीच्या आधारे, देवरी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेनुसार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. दरम्यान, देवरी पोलिस, उपविभागीय पोलिस अधिकार्यांचे कार्यालय आणि गोंदिया सायबर सेल यांनी संयुक्तपणे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे विविध ठिकाणी छापे टाकून या प्रकरणातील आरोपी सौरभ हिरामण तलमले (27), यादव रामचंद्र तलमले (21), नितीन शेखर वालदेकर (21) तिघेही रा. पवनी ता. पवनी जि. भंडारा, विलास प्रल्हाद रामटेके (52) रा. खरमटोला, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली, शुभम ज्ञानेश्वर तेलमासरे (23) रा. पाचपावली, बारसेनगर, नागपूर, महादेव डोंगर लाहार रा. नागपूर,दिनदयाल अनयोनी बेंजामिन (40) रा. सोनबानगर, बोपुताईनगर वॉर्ड, नागपूर या सात जणांना 1 जून रोजी अटक केली. तर आरोपी राधेश्याम उर्फ राधे शिवदास खोब्रागडे (33) रा. गंगाबाई घाट, नागपूर याला 2 जून रोजी व सौनव उर्फ गुल्लू सुदेश मासूरकर (30) रा. पचापावली, बारसेनगर, नागपूर, अजय उर्फ मामा राजेंद्र बागडे (35) रा. बजरंगनगर, गल्ली क्र. 1, भूखंड क्र. 5, मानेवाडा, नागपूर या दोघांना बुधवारी 3 जून रोजी अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून घटनेत समाविष्ट तीन चार चाकी वाहन किमत 15 लाख जप्त केले. सर्व आरोपींना बुधवारी 3 जून रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 6 जून पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. पुढील तपास देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील करत आहेत.