मुंबई,
Cannibal Holocaust हॉरर चित्रपटांच्या इतिहासात 1980 साली प्रदर्शित झालेला ‘कॅनिबल होलोकॉस्ट’ हा चित्रपट आजही सर्वाधिक वादग्रस्त आणि चर्चित चित्रपटांपैकी एक मानला जातो. इटालियन दिग्दर्शक रुगेरो देवडातो यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने आपल्या अत्यंत हिंसक आणि धक्कादायक दृश्यांमुळे जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटवल्या होत्या. प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट अनेक देशांमध्ये बंदी आणि कायदेशीर कारवाईच्या केंद्रस्थानी राहिला.
7 फेब्रुवारी 1980 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा अमेझॉनच्या घनदाट जंगलात बेपत्ता झालेल्या डॉक्युमेंटरी चित्रपट निर्मात्यांच्या शोधाभोवती फिरते. कथानकात एका मानववंशशास्त्रज्ञाला जंगलात सापडलेल्या व्हिडिओ फुटेजमधून हळूहळू भयावह घटनांचा उलगडा होत जातो, अशी मांडणी करण्यात आली आहे. ही संकल्पना त्या काळात प्रचंड धक्कादायक मानली गेली होती.
‘फाउंड फुटेज’ या शैलीत चित्रित करण्यात आलेल्या या चित्रपटामुळे त्यातील दृश्ये अतिशय वास्तववादी भासत होती. परिणामी, प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि चित्रपटातील काही प्रसंग खरे असल्याचा समजही काही जणांनी करून घेतला होता. चित्रपटातील अतिशय हिंसक दृश्ये तसेच प्राण्यांवरील क्रूरतेच्या आरोपांमुळे जगभरातून तीव्र टीका करण्यात आली.
या वादामुळेच 50 हून अधिक Cannibal Holocaust देशांनी या चित्रपटावर बंदी घातली होती. कमी बजेटमध्ये, सुमारे 1 लाख डॉलर्समध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने सुमारे 20 लाख डॉलर्सची कमाई करत व्यावसायिक यशही मिळवले. मात्र या यशासोबतच वाद आणि टीकेची मोठी किनारही कायम राहिली.काळाच्या ओघात ‘कॅनिबल होलोकॉस्ट’ हा चित्रपट हॉरर सिनेमाच्या इतिहासात ‘कल्ट क्लासिक’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. तरीही त्यातील अत्यंत ग्राफिक आणि अस्वस्थ करणाऱ्या दृश्यांमुळे तो सर्व प्रेक्षकांसाठी योग्य मानला जात नाही. त्यामुळे आजही हा चित्रपट जगातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या आणि वाद निर्माण करणाऱ्या हॉरर चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.