मुख्यमंत्री समृद्धी ग्राम अभियानांत पळसगाव सुसाट

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
सेलू,
cm-samruddhi-village-campaign : लोकसहभागाची भकम साथ आणि ग्रामविकासाचे प्रेरणादायी मॉडेल म्हणून ओळख निर्माण केलेल्या पळसगाव (बाई) गावाने पुन्हा एकदा आपल्या कार्याचा ठसा उमटविला. मुख्यमंत्री समृद्धी ग्राम अभियानांतर्गत परभणी जिपच्या चमूने गावाला भेट देत पाहणी केली.
 
 
j
 
 
 
गावाच्या प्रवेशद्वारापासूनच स्वच्छता, शिस्त आणि विकासाची झलक पाहायला मिळत होती. परभणी जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनी माथूर यांच्या नेतृत्वाखालील चमू ग्रापं कार्यालयात दाखल झाले. यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर्यस खांडेकर, डॉ. स्मिता पवार, अंकुश चव्हाण, डॉ. प्रकाश दाते, के. टी. कानडे, राठोड, अमोल कोठे, तसेच वर्धा जिप पाणीपुरवठा विभागाचे परांडे यांच्यासह गटविकास अधिकारी देवानंद पाणबुडे, विस्तार अधिकारी सचिन खाडे आणि बदरिया, आदी सहभागी झाले होते.
 
 
विकासकामं आणि गावाच्या प्रगतीचा आराखडा ग्रापं अधिकारी धीरज लेंडे यांनी सादर केला. अधिकार्‍यांनी गावातील सर्व नोंदी, कागदपत्रे आणि अहवालाची तपासणी केली. त्यानंतर प्रत्यक्ष स्थळभेट देत विकासकामांची पाहणी करण्यात आली. गावातील २४ तास पाणीपुरवठा व्यवस्था, जनावरांच्या आंघोळीसाठी निर्माण केलेल्या सुविधा, कचरा व्यवस्थापन प्रणाली, शेतकर्‍यांसाठी उद्योगाभिमुख उपक्रम, लोकसहभागातून साकारलेले रस्ते व इतर विकासकामे, डिजिटल लायब्ररी यांची माहिती देण्यात आली.
 
 
 
गावातील जलव्यवस्थापनाच्या उपक्रमांनी विशेष लक्ष वेधून घेतले. सीएचओ काजल कांबळे यांनी आरोग्यविषयक कामांची माहिती दिली. शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमांची माहिती दीपक कांबळे यांनी दिली. महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातही गावाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन, उद्योग संधी आणि सामाजिक नेतृत्वाची संधी मिळाल्याचे सांगण्यात आले.
 
 
अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि महिला बचत गटांनी बालकांचे पोषण, आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे सादरीकरण केले.