वाशीम,
illegal-liquor-sellers : वाशीम उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ३ जून २०२६ रोजी वाशीम शहर, ग्रामीण आणि मालेगाव परिसरात अवैधरित्या दारू विक्री करणार्यांविरुद्ध धडक मोहीम राबवली. या कारवाईत एकूण १२ आरोपींविरुद्ध ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल ३ लाख ५५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाशीम शहरात पाच जणांना अटक शहर पोलिस स्टेशन अंतर्गत स्वागत लॉन परिसरात दोन इसम स्कुटीवरून देशी दारूची वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत ६८०० रुपयांची देशी दारू, ८० हजार रुपयांची स्कूटी आणि २० हजार ३०० रुपयांचे मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चंद्रकांत कैलास राऊत, विष्णू पवार, आदित्य गजानन गायकवाड, आशिष गायकवाड आणि उमेश ढवळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाशीम -मालेगाव रोडवरील शिवनेरी आणि युवराज हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकली. यात ज्ञानेश्वर व. गोरे याच्याकडून १७ हजार ६०० रुपयांची देशी-विदेशी दारू, तर शंकर गोरे याच्याकडून १५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल (दारू आणि मोबाईल) जप्त करण्यात आला. या दोन्ही आरोपींविरुद्ध वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
मालेगाव तालुयातील अमानी गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी हातभट्टी आणि मोहमाच साठवणूक करणार्या रॅकेटचा पर्दाफाश केला. घटनास्थळावरून २२५ किलो मोहामाच सडवा, १५० किलो मोहफुले, गावठी दारू आणि मोटारसायकल असा १ लाख ३६ हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणात रवी संतोष तिवले, संतोष नामदेव तिवले, कमला देवीदास जाधव, धनंजय राजाराम जाधव आणि रेखाबाई सुखदेव झ्याटे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिनेश शिरेकार, पोलिस कर्मचारी हरिभाऊ कालापाड, अरविंद राठोड, स्वप्नील शेळके, अशोक कोकाटे, संदीप मळघणे आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आर.सी.पी. पथकाने यशस्वीपणे पार पाडली.