नवी दिल्ली,
Delhi Hotel Accident दिल्लीतील मालवीय नगर परिसरात घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने राजधानी हादरली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. आग लागल्यानंतर इमारतीत अडकलेल्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि जीव वाचवण्यासाठी काहींनी थेट खिडक्यांतून व छतावरून उड्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.प्राथमिक तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ज्या इमारतीत आग लागली त्या रेस्टॉरंटकडे आवश्यक अग्निसुरक्षा परवाना नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इमारतीच्या वरच्या मजल्यावरील गेस्ट हाऊसला केवळ सहा खोल्यांची परवानगी असताना प्रत्यक्षात तेथे सुमारे २५ खोल्या सुरू असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.घटनावेळी इमारतीत एकूण ४७ जण उपस्थित होते. त्यामध्ये विविध राज्यांतील तसेच परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता. आग पसरताच लोकांनी मदतीसाठी आर्त हाका मारल्या. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत गाद्या आणि इतर साहित्य टाकून अडकलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक खिडक्या आणि काचा बंद असल्यामुळे बचावकार्याला अडथळे निर्माण झाले.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, इमारतीला केवळ एकच प्रवेशद्वार होते आणि ते इलेक्ट्रॉनिक लॉक प्रणालीवर आधारित होते. आग लागल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे हे प्रवेशद्वार बंद झाले आणि अनेक लोक आत अडकून पडले. त्यामुळे दुर्घटनेची तीव्रता आणखी वाढल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, काही अधिकाऱ्यांनी प्राथमिक स्तरावर सिलेंडर स्फोटामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली असली तरी आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून मोठे बचावकार्य राबवले आणि अनेकांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, आगीच्या झळा इतक्या तीव्र होत्या की मोठी जीवितहानी टाळता आली नाही.तपास यंत्रणांनी या प्रकरणात हॉटेलच्या मालकीसह सुरक्षाविषयक सर्व बाबींची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलचा मालक लोकेश बजाज असल्याचे समोर आले आहे. हॉटेलच्या व्यवस्थापनात इतर भागीदारांचाही सहभाग असल्याची माहिती मिळाली असून त्यांच्या व्यवसायिक व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे. या दुर्घटनेनंतर राजधानीतील हॉटेल्स, गेस्ट हाऊसेस आणि व्यावसायिक इमारतींच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.