तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
priyadarshini-uike : शहरातील विविध भागांमध्ये सध्या भुयारी गटार (अंडरग्राऊंड ड्रेनेज), पाणीपुरवठा व इतर पायाभूत सुविधांशी संबंधित विकासकामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून सुरू आहेत. या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदाई सुरू असून नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. मात्र, ही कामे शहराच्या भविष्यातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने नागरिकांनी संयम राखून सहकार्य करावे, असे आवाहन यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांनी केले आहे.

अध्यक्ष अॅड. उईके यांनी म्हटले आहे की, विकासकामांचे नियोजन, मंजुरी, अंमलबजावणी व तांत्रिक देखरेख ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारित येते. त्यामुळे रस्ते खोदाई, कामांचा वेग अथवा इतर तांत्रिक बाबींमध्ये यवतमाळ नगर परिषदेचा थेट हस्तक्षेप अथवा निर्णयाधिकार नाही. शहरातील नागरिकांनी या संदर्भात कोणताही गैरसमज करून घेऊ नये. विकासकामे पूर्ण झाल्यानंतर शहराला अधिक सक्षम भुयारी गटार व्यवस्था, सुधारित पायाभूत सुविधा आणि उत्तम नागरी सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून विकासकामांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
तसेच, कामांबाबत कोणतीही तक्रार अथवा अडचण असल्यास नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबंधित अभियंत्यांशी थेट संपर्क साधावा, असेही नप अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी अशोक उईके यांनी सांगितले. यवतमाळ शहरात सुरू असलेल्या भुयारी गटात आणि पाणीपुरवठा कामांबद्दल कोणतीही अडचण अथवा तक्रार असल्यास त्यांनी अजय खंताडे (9604446676), आशिष कांबळे (8459642434), संतोष खिल्लारे (8390909051), गणेश कावलकर (8805503938) किंवा भगतसिंह वाईकर (7709441329) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.