नागपूर,
district-council-project-dream : विद्यार्थ्यांसह गावपातळीवरील सर्वच घटकांमध्ये वाचनसंस्कृती, अध्ययनाची आवड, जागरूकता, व्यक्तिमत्त्व चालना मिळावी तसेच त्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचीही ओळख करुन देण्याच्या उद्देशाने नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बहुचर्चित ‘प्रोजेक्ट ड्रीम’ या अभिनव उपक्रमाला टपाल विभागाने विशेष सन्मान प्रदान केला आहे. या अभिनव उपक्रमाला टपाल विभागाने आपल्या विशेष टपाल कव्हरवर स्थान दिले असल्याने ‘प्रोजेक्ट ड्रीम’ला राष्ट्रीय स्तरावर व्यापक ओळख मिळणार आहे.
नागपूर जिल्ह्यात ‘प्रोजेक्ट ड्रीम’ ची सुरुवात
नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या संकल्पनेतून गेल्यावर्षी नागपूर जिल्ह्यात ‘प्रोजेक्ट ड्रीम’ ची सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील १०३ गावांमध्ये लायब्ररी सुरु करण्यात आल्या आहेत. या लायब्ररी उभारण्यासाठी गावांमध्ये उपयोगात नसलेल्या किंवा फारसा वापर नसलेल्या इमारतींचा वापर करण्यात असून त्यांना आधुनिक रूप देण्यात आले आहे. सध्या या लायब्ररींमध्ये स्पर्धा परीक्षांसह, शैक्षणिक, कथा-कादंबर्यांसह विविध पुस्तकांचे संच उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय दोन संगणक आणि स्मार्ट टीव्ही उपलब्ध करण्यात आले गावांमधील प्रामुख्याने युवावर्ग मोठ्या प्रमाणात या सुविधांचा मोफत वापर करत आहेत.
शंभर गावांमध्ये लायब्ररी उभारणार
लायब्ररीतील स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षेची तयारीचा लाभ घेता येत आहे. येत्या काळात आणखी १०० गावांमध्ये अशा सुसज्ज लायब्ररी उभारण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या स्तरावर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फेलोशीप कार्यक्रमाचे वेदांत पाठक दिली. जिल्हा परिषदेच्या या प्रकल्पाची टपाल विभागाने एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने दखल घेतली असून टपाल विभागाच्या विशेषप्रसंगी तयार येणार्या विशेष कव्हरवर (एक प्रकारचा विशेष लिफाफा) यंदा ‘प्रोजेक्ट ड्रीम’ला स्थान देण्यात आले आहे. या कव्हरचे वितरण देशपातळीवर होत असल्याने यानिमित्ताने नागपूर जिल्हा परिषदेच्या या प्रकल्पाला देशव्यापी ओळख मिळणार टपाल तिकिटांप्रमाणे टपाल विभागाच्या विशेष कव्हर्सचे संकलन करणारा एक मोठा वर्ग (फिलाटेलिस्ट) आहे, हे विशेष.
भारतीय टपाल विभाग जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अलिकडेच या विशेष कव्हरचा प्रकाशन सोहळा नागपूर जीपीओ येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, कपिल कलोडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निलेश गुंड, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) निखिल भुयार, मुख्यमंत्री फेलो वेदांत पाठक, वरिष्ठ पोस्टमास्तर सुजितकुमार लांडगे तसेच जिल्हा परिषद भारतीय टपाल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.