आरोपींना घटनास्थळी आणताच संतप्त नागरिकांचा संताप; हल्ल्याचा प्रयत्न

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
पुणे
Fugewadi Poison Liquor पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात घडलेल्या विषारी दारूकांडामुळे संपूर्ण राज्य हादरले असून या प्रकरणात मृतांचा आकडा १८ च्या पुढे गेला आहे. या घटनेच्या तपासासाठी आरोपींना घटनास्थळी आणण्यात आले असता संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मात्र, सीआयडी आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
 

Fugewadi Poison Liquor Case, Pimpri Chinchwad Toxic Liquor Tragedy, 
फुगेवाडी आणि हडपसर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या या विषारी दारूकांडाने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिस यंत्रणेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर २२ हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवला आहे.
तपासादरम्यान मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह राधेश्याम प्रजापती, कर्नल मिरका सिंग आणि गुरु मंगल सिंग या चार आरोपींना पिंपरी न्यायालयाने ८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासाचा भाग म्हणून सीआयडीच्या पथकाने या आरोपींना फुगेवाडीतील घटनास्थळी आणून पंचनामा आणि गुन्ह्याची पुनर्रचना (सीन रिक्रिएशन) केली.
आरोपी घटनास्थळी दाखल होताच स्थानिक नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आपल्या कुटुंबीयांना गमावलेल्या नागरिकांचा रोष उफाळून आला होता. तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींना परत नेले जात असताना काही नागरिकांनी त्यांच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या वेळी एका ज्येष्ठ Fugewadi Poison Liquor महिलेनेही आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. काही तरुणांनी संतापाच्या भरात दगड उचलून मारण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. आरोपींभोवती सुरक्षा कवच निर्माण करून जमावाला रोखण्यात आले आणि आरोपींना त्वरित पोलिस वाहनातून सुरक्षित स्थळी रवाना करण्यात आले.पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही दुखापत किंवा अनुचित घटना घडली नाही. दरम्यान, या संपूर्ण घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विषारी दारूकांडामुळे फुगेवाडी परिसरात अद्यापही संतापाचे वातावरण कायम असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून युद्धपातळीवर सुरू असून विषारी दारूचे उत्पादन, वितरण आणि त्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी विविध अंगांनी चौकशी करण्यात येत आहे. मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.