मुंबई,
FWICE Lifts Restrictions on Ranveer बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने याच्याविरोधात जाहीर करण्यात आलेला असहकाराचा आदेश अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या निर्णयामुळे रणवीर सिंगला मोठा दिलासा मिळाला असून चित्रपटसृष्टीतही समाधान व्यक्त केले जात आहे. काही दिवसांपूर्वी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने रणवीर सिंगविरोधात असहकाराची भूमिका घेतली होती. एका चित्रपट प्रकल्पातून अचानक बाहेर पडल्यामुळे निर्मात्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर निर्माते आणि उद्योगातील विविध घटकांना रणवीरसोबत काम करताना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.
मात्र, त्यानंतर विविध स्तरांवर झालेल्या चर्चांनंतर आणि उद्योगातील प्रमुख संघटनांच्या मध्यस्थीनंतर एफडब्ल्यूआयसीईने आपली भूमिका बदलली. संघटनेने जारी केलेल्या निवेदनात मनोरंजन क्षेत्रातील एकता, सलोखा आणि सहकार्य टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. मतभेद आणि वाद हे संघर्ष वाढवण्याऐवजी चर्चेच्या माध्यमातून सोडवले जावेत, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.निवेदनात संघटनेने भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील कामगार, तंत्रज्ञ, कलाकार आणि इतर घटकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. त्याचबरोबर उद्योगातील सर्व पक्षांनी परस्पर आदर आणि जबाबदारीची भावना जपावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात निर्माता संघटनांनी केलेल्या मध्यस्थीची दखल घेत एफडब्ल्यूआयसीईने त्यांचे आभार मानले आहेत. उद्योगातील वातावरण सकारात्मक राहावे आणि भविष्यात अशा वादांचे निराकरण संवादातून व्हावे, अशी अपेक्षाही संघटनेने व्यक्त केली. दरम्यान, रणवीर सिंगच्या आगामी चित्रपटांकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तो लवकरच नव्या मोठ्या प्रकल्पांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याच्या आगामी चित्रपटांबाबत उत्सुकता वाढली आहे.