गोंदिया,
soybean-oil-stock-seized : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यात भेसळयुक्त, निकृष्ट आणि मानकांचे अल्लंघन करणार्या अन्नपदार्थ विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गोंदिया येथील पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे 1 जून रोजी धडक कारवाई करून नियमबाह्य व संशायास्पद सोयाबीन तेलाचा मोठा साठा जप्त केला आहे.

पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहरातील नगर परिषद परिसरातील ‘मेसर्स गुरुनानक चिरोंजी भंडार’ या व्यावसायिक प्रतिष्ठानची अन्न सुरक्षा अधिकार्यांनी अचानक आणि सखोल तपासणी केली. सदर तपासणीची कारवाई ही आस्थापनेचे मालक किशोर कन्हैयालाल नागदेव यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पाडण्यात आली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा अधिकार्यांना बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवलेले ’कुबेर’ ब्रेडचे रिफाइंड सोयाबीन तेल हे अन्न सुरक्षा मानकांनुसार अत्यंत निकृष्ट व अप्रमाणित असल्याचा तीव्र संशय पथकाला आला. त्यातच सदर तेल रिपॅकिंग करण्यासाठी आधीच वापरण्यात आलेल्या जुन्या आणि दूषित टीनच्या डब्यांचा सर्रास वापर केला जात असल्याचा संशय पथकाला आला. अशा जुन्या डब्याच्या पुनर्वापरामुळे खाद्यतेलामध्ये रासायनिक क्रिया इतर विषारी घटकांचे मिश्रण होण्याची भीती असते, जी मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
या गंभीर बाबींची तात्काळ दखल घेत, अन्न सुरक्षा पथकाने ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेऊन 688.4 किलो ग्रॅम रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जागीच जप्त केला. या जप्त केलेल्या मालाची किमत 1 लाख 37 हजार 680 रुपये इतकी आहे. जप्त करण्यात आलेल्या सोयाबीन तेलाचे अधिकृत अन्न नमुने कायद्यानुसार गोळा करण्यात आले असून ते पुढील रासायनिक विश्लेषणासाठी व प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानतर, संबंधित दोषी व्यक्ती आणि फर्मविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 मधील तरतुदीनुसार आणखी कठोर कारवाई करण्यात येईल. ही कारवाई सहायक आयुक्त अमृता शिर्के तसेच सह आयुक्त नागपुर कृष्णा जयपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, गोंदिया कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी ओ. दे. लांजेवार यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली.