नागपूर,
Gorakshan Sabha Nagpur गोवंश संरक्षण व संवर्धनासाठी कार्यरत नागपुरातील सर्वात जुनी संस्था गोरक्षण सभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व सदस्य अविरोध निवडून आले.
निवडणूक अधिकारी अॅॅड. गिरीश खोरगडे, सह निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. अमित चन्ने यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले. गोरक्षण सभेच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध उद्योजक सारंग गडकरी, उपाध्यक्षपदी प्रकाश दीक्षित, सचिवपदी प्रसन्न पातूरकर, सह सचिवपदी पुष्कर बुटी, कोषाध्यक्षपदी हर्षल आर्वीकर, कार्यालय मंत्रीपदी आशुतोष गोटे, सदस्यपदी सीए शिरीष भगत, दिलीप मसे, निरंजन रिसालदार, राम मुंजे, ममता चिंचवडकर यांची अविरोध निवड झाली.
या 1888 साली स्थापित Gorakshan Sabha Nagpur झालेल्या गोरक्षण सभेंंतर्गत धंतोली, वर्धा रोड स्थित गोपालकृष्ण मंदिर तसेच गोशाळा, उमरेड रोड येथील पेंढरी गावी शेती व गोशाळा संचालित करण्यात येत आहे. जवळपास दोन हजार गायींचे संगोपन गोरक्षण सभा करत असून कसायांच्या तावडीतून सोडवलेले गोवंश, महानगर पालिकेद्वारे उचलण्यात आलेले गोवंश गोरक्षण सभेद्वारे स्वीकारण्यात येतात.
अपघातात जखमी झालेल्या गोवंशाची वैद्यकीय चिकित्सा करण्यात येते. भारतीय गायींच्या विविध प्रजातींचे संरक्षण, संगोपन तसेच वृद्धी करण्याचे कार्य गोरक्षणमार्फत होत आहे. प्रस्तावित प्रकल्पांमध्ये गो सेवकांच्या प्रशिक्षणासाठी सुसज्जित भवन, आधुनिक गो शाळा, गो प्रदक्षिणा पथ तसेच गोवंशाकरिता चिकित्सालयाचा समावेश असून मंदिराच्या माध्यमातून होलिका दहन उत्सव, श्रीराम नवमी उत्सव, जन्माष्टमी उत्सव, गोपाष्टमीनिमित्त गो पूजन, तुलसी विवाह इत्यादी उपक्रम घेण्यात येतात. या सर्व उपक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिवर्षी मिळतो.