वॉशिंग्टन,
H-1B Visa Application in the US अमेरिकेत काम करण्यासाठी एच-१बी व्हिसाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या वर्षी तब्बल दोन लाखांहून अधिक अर्जदारांनी प्रीमियम प्रक्रिया निवडत १,००,००० डॉलर्स (सुमारे ८० लाख रुपये) शुल्क भरल्याची माहिती अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) दिली आहे. या निर्णयामुळे एच-१बी व्हिसा प्रक्रियेतील गती आणि खर्च यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.अमेरिकेच्या सिनेटमधील विनियोग उपसमितीसमोर बोलताना विभागाचे सचिव मार्कवेन मुलीन यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष २०२६ साठी सुमारे २,८६,००० एच-१बी अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी मोठ्या संख्येने अर्जदारांनी अतिरिक्त शुल्क भरून जलद प्रक्रियेचा पर्याय स्वीकारला आहे.

मुलीन यांच्या माहितीनुसार, प्रीमियम शुल्क भरलेल्या अर्जांवर साधारण १५ दिवसांत प्रक्रिया केली जाते, तर सामान्य अर्जांना साडेसात महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे जलद निर्णयासाठी मोठ्या प्रमाणावर अर्जदारांनी हा महागडा पर्याय निवडल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान, या मुद्द्यावर सिनेटमध्ये ग्रामीण भागातील डॉक्टर आणि तज्ञांच्या कमतरतेबाबतही चर्चा झाली. सिनेट सदस्या सुसान कॉलिन्स यांनी काही ग्रामीण रुग्णालयांना परदेशी डॉक्टर आणण्यासाठी हा मोठा खर्च करावा लागत असल्याचे सांगितले आणि अशा प्रकरणांमध्ये सवलतीचा विचार करण्याची मागणी केली. त्यावर अधिकाऱ्यांनी भविष्यात परिस्थितीनुसार उपाययोजना आणि सवलतीच्या शक्यता तपासल्या जातील असे आश्वासन दिले. तसेच इतर सिनेट सदस्यांनीही ग्रामीण भागातील शिक्षक आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ञांच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित करत H-1B धोरणावर पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित केली आहे.