नवी दिल्ली,
icc-test-rankings-update : आयसीसीने पुन्हा एकदा नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय संघाने बऱ्याच काळापासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही, तरीही भारतीय संघाच्या खेळाडूंच्या क्रमवारीत बदल झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलच्या क्रमवारीत किंचित घट झाली आहे, तर ऋषभ पंतने प्रगती केली आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रचिन रवींद्रने अव्वल १० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.
आयसीसीने नवीन कसोटी क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. अव्वल पाच फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट ८८० रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडचाच हॅरी ब्रूक ८५७ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ट्रॅव्हिस हेड ८५३ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह स्मिथ ८३१ रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन ८०७ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने दोन स्थानांची झेप घेतली आहे. त्याने आता अव्वल १० खेळाडूंमध्ये आपले स्थान निश्चित केले असून, तो नवव्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग ७३७ वर पोहोचले आहे. आयर्लंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यातील रवींद्रच्या शानदार शतकाचा त्याला क्रमवारीत फायदा झाला आहे. रचिनच्या या प्रगतीमुळे भारतीय कर्णधार शुभमन गिलला फटका बसला आहे. तो आता एका स्थानाने घसरून १० व्या क्रमांकावर आला आहे. गिलचे रेटिंग ७३० आहे आणि आता तो अव्वल १० मधून बाहेर पडण्याच्या धोक्यात आहे.
शुभमन गिलची घसरण झाली असताना, ऋषभ पंतने एक स्थान वर झेप घेतली आहे. त्याचे रेटिंग ७०४ असले तरी, त्याने आता एका स्थानाची झेप घेत १३ वे स्थान पटकावले आहे. ऋषभ पंतही एकही कसोटी सामना खेळलेला नाही, पण न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल त्याच्या खराब कामगिरीमुळे दोन स्थानांनी खाली घसरला आहे, ज्याचा फायदा पंतला झाला आहे. अॅलेक्स कॅरीनेही एक स्थान वर झेप घेतली आहे .
भारतीय संघ बऱ्याच कालावधीनंतर मैदानावर परतणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना ६ जूनपासून सुरू होत आहे. त्यात गिल आणि पंत खेळतील. हा सामना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नसला तरी, खेळाडूंच्या कामगिरीचा त्यांच्या रँकिंगवर निश्चितच परिणाम होईल. याचा अर्थ असा की, पुढील रँकिंगमध्ये केवळ दोन्ही संघांतील खेळाडूंचे रेटिंगच बदलणार नाही, तर त्यांची रँकिंग वाढू किंवा कमीही होऊ शकते.