रेल्वेगाडीतून गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक करणारा ताब्यात

- ऑपरेशन ‘संरक्षा’ अंतर्गत आरपीएफची मोठी कारवाई

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
गोंदिया, 
illegal-transport-of-gas-cylinders : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तसेच रेल्वे परिसर आणि रेल्वेगाड्यांमधून ज्वलनशील पदार्थांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळातर्फे ऑपरेशन संरक्षा अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान रेल्वेतून गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक करणार्‍या एका आरोपीला सोमवारी 1 जून रोजी आरपीएफच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दिनेश रतनसिंह नैकावे रा. सिरपूर/बानाथर, ता. जि. गोंदिया असे त्या आरोपीचे नाव आहे.
 
 

jk 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मंडळ सुरक्षा आयुक्त चेतन दिलीपराव जिचकार यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफकडून विविध रेल्वे स्थानके व रेल्वेगाड्यांमध्ये विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत आरपीएफच्या विशेष पथकांसह राज्य यंत्रणाही सहकार्य करत आहेत. दरम्यान, सोमवारी गोंदिया रेल्वे स्थानकावर आरपीएफ पोस्ट गोंदिया आणि मंडळ टास्क टीमने संयुक्त तपासणी मोहीम राबविली. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आरोपी दिनेश याला पोत्यामध्ये गॅस सिलिंडर नेत असताना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने नागपूर येथे मजुरीचे काम करत असून घरगुती वापरासाठी गॅस सिलिंडर गावाहून रेल्वेमार्गे नागपूरला नेण्याचा प्रयत्न करत असल्याची कबुली दिली. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने आरोपीला रेल्वे कायद्यातील तरतुदींची माहिती दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.