भारताचे टी-२० नंतर ५ वनडे आणि २ कसोटी सामने

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
India 2 Test Matches भारतीय क्रिकेट संघाचा आगामी न्यूझीलंड दौरा जाहीर करण्यात आला असून, या दौऱ्यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सलग पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ठरणार आहे. सात वर्षांनंतर प्रथमच भारतीय संघ परदेशात इतक्या मोठ्या वनडे मालिकेत सहभागी होणार आहे.न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, या दौऱ्याची सुरुवात पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांनी होणार आहे. त्यानंतर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल आणि अखेरीस दोन कसोटी सामने होतील. आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
 
 

India Matches 
 
भारतीय संघाने याआधी २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली होती, ज्यात भारताने ४-१ असा विजय मिळवला होता. त्या मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रोहित शर्माने फलंदाजीत दमदार कामगिरी केली होती, तर मोहम्मद शमीने प्रभावी गोलंदाजी करत मालिकावीर पुरस्कार पटकावला होता.गेल्या काही वर्षांत भारतीय संघ प्रामुख्याने तीन सामन्यांच्या मालिकाच खेळताना दिसत होता. टी-२० लीग्सची वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वाढते प्रमाण यामुळे द्विपक्षीय मालिका मर्यादित राहिल्या होत्या. मात्र, आता पुन्हा एकदा मोठ्या वनडे मालिकेला संधी मिळाल्याने खेळाडूंना दीर्घ स्वरूपात स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. ही मालिका २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. संघाला आपल्या रणनीती, संयोजन आणि खेळाडूंच्या फॉर्मचा आढावा घेण्यासाठी ही उत्तम संधी मानली जात आहे. तसेच, अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष असेल.