कोकणात जुईली दळवींची माघार, तटकरे आघाडीवर

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
रायगड,
Juili Dalvi Withdraws in Konkan रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत रंगलेला महायुतीतील अंतर्गत वाद अखेर निवळल्याचे चित्र दिसून आले आहे. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्यासमोरील मोठा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे कोकणातील या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत महायुतीतील तणावाला पूर्णविराम मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला होता. त्यानुसार पक्षाने अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, जुईली दळवी यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने आणि काही स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वातावरण तापले होते. या घडामोडींमुळे महायुतीतील मतभेद उघडपणे समोर आले होते.
 

Juili Dalvi Withdraws in Konkan 
दरम्यान, वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती बदलली. अखेर जुईली दळवी यांच्या वतीने त्यांचा अर्ज अधिकृतपणे मागे घेण्यात आला. त्यावेळी काही स्थानिक पदाधिकारी आणि समर्थक उपस्थित होते. जुईली दळवी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकल्या नसल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले.विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रायगड दौऱ्यापूर्वीच ही माघार घेण्यात आली. त्यामुळे महायुतीतील नाराजी दूर करण्यासाठी झालेल्या चर्चांना यश आल्याचे मानले जात आहे. जुईली दळवी यांच्या माघारीनंतर अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
 
 
दरम्यान, अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघात मात्र अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. या मतदारसंघात पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. भाजप-महायुतीने अधिकृत उमेदवार म्हणून प्राजक्त तनपुरे यांना संधी दिली असली, तरी महाविकास आघाडीने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसचे स्थानिक नेते करण ससाणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज कायम ठेवला असून त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच इतर अपक्ष उमेदवारांनीही आपली उमेदवारी कायम ठेवली असल्याने अंतिम मुदतीनंतरच या मतदारसंघातील निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.