मुंबई
Made in India A Titan Story काही कथा कंपन्यांची निर्मिती करतात, काही वारसा घडवतात, तर काही संपूर्ण राष्ट्राची ओळख जगाच्या नकाशावर अधोरेखित करतात. भारतातील आघाडीची विनामूल्य, प्रीमियम आणि जाहिरात-समर्थित व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा ऍमेझॉन एमएक्स प्लेयरने त्यांच्या आगामी ‘मेड इन इंडिया – अ टायटन स्टोरी’ या बहुप्रतीक्षित मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. भारतातील सर्वात प्रतिष्ठित ग्राहक ब्रँडपैकी एक असलेल्या टायटनच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही मालिका प्रेक्षकांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.
प्रसिद्ध लेखक विनय कामत यांच्या ‘टायटन – इंडियाज मोस्ट सक्सेसफुल कन्झ्युमर ब्रँड’ या गाजलेल्या पुस्तकावर आधारित असलेल्या या मालिकेत भारतीय उद्योगविश्वातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि टायटनच्या उभारणीमागील दूरदृष्टीचे चित्रण करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी जेआरडी टाटा यांची भूमिका साकारली असून अभिनेता जिम सर्भ झेरक्सेस देसाई यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय वैभव तत्त्ववादी, नमिता दुबे, लक्षवीर सरन आणि कावेरी सेठ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका मालिकेत आहेत.
करण व्यास यांनी लिखाण केलेल्या आणि रॉबी ग्रेवाल यांनी दिग्दर्शित केलेल्या या सहा भागांच्या मालिकेची निर्मिती अलमाइटी मोशन पिक्चर्सने केली आहे. महत्त्वाकांक्षा, नेतृत्व, मार्गदर्शन आणि उत्कृष्टतेसाठीचा अथक संघर्ष या संकल्पनांभोवती ही कथा गुंफण्यात आली आहे. ‘मेक इन इंडिया’च्या भावनेशी सुसंगत असलेली ही मालिका भारताला जागतिक उत्पादन आणि डिझाइन केंद्र बनविण्याच्या स्वप्नाची कहाणी उलगडते.
मालिकेचा ट्रेलर झेरक्सेस Made in India A Titan Story देसाई यांच्या दृष्टिकोनातून टायटनच्या यशस्वी प्रवासाची झलक दाखवतो. भारतीय घड्याळांचा जागतिक दर्जाचा ब्रँड उभारण्याच्या धाडसी कल्पनेपासून सुरू झालेला हा प्रवास पुढे भारतीय उद्योगविश्वातील यशाचे प्रतीक कसा बनला, याचे प्रभावी चित्रण ट्रेलरमध्ये करण्यात आले आहे. महत्त्वाकांक्षा, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर उभारलेली ही गाथा प्रेक्षकांना प्रेरणा देणारी ठरणार असल्याचे दिसून येते.