नवी दिल्ली,
Massive fire at a restaurant in Delhi नवी दिल्लीतील मालवीय नगर परिसरात असलेल्या ‘लेमन ग्रीन’ या रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागून मोठा अपघात घडला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये बहुतांश दक्षिण आफ्रिकेतील नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली अग्निशमन सेवेला बुधवारी सकाळी ९:४५ वाजता आगीची माहिती मिळाली. काही क्षणांतच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीने रेस्टॉरंटच्या तळघरासह संपूर्ण परिसराला वेढा घातल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती.

अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत तळघरातून अनेक लोकांना बाहेर काढले. बाहेर काढलेल्या जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.घटनास्थळी नेहरू प्लेस अग्निशमन केंद्राचे अधिकारी रवींद्र यांच्यासह मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. सुमारे १० अग्निशमन वाहने आग विझवण्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आली. काही वेळानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले, मात्र बचावकार्य अजूनही सुरू आहे.
या दुर्घटनेत मृत झालेल्यांपैकी बहुतांश नागरिक दक्षिण आफ्रिकेचे असल्याचे समोर आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्या ओळखीची पुष्टी करण्याचे काम सुरू आहे. रेस्टॉरंटला आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून घटनास्थळी तपास सुरू असून संपूर्ण परिसराची सखोल पाहणी केली जात आहे.