लखनौ,
not a single candidate is eligible in APS उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात आलेल्या अप्पर प्रायव्हेट सेक्रेटरी (एपीएस) परीक्षा-२०२३ चा निकाल अत्यंत धक्कादायक ठरला आहे. या परीक्षेसाठी बसलेल्या ४,२४० उमेदवारांपैकी एकही उमेदवार अंतिम टप्प्यात पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे ३३१ पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. या परीक्षेत हिंदी शॉर्टहँड आणि टायपिंग हा मुख्य निकष होता. नियमांनुसार उमेदवारांना प्रति मिनिट किमान ८० शब्दांची अचूक टायपिंग क्षमता दाखवणे आवश्यक होते. मात्र, एकही उमेदवार चुका न करता ही गती गाठू शकला नाही. त्यामुळे सर्व उमेदवार अंतिम पात्रता निकषातून बाहेर पडले.
प्राथमिक टप्प्याचा निकाल ४ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये एकूण ५,८८९ उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी पात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर २८ जून ते १८ जुलै २०२४ दरम्यान लखनौ येथे दुसरा टप्पा दोन सत्रांमध्ये पार पडला. याच टप्प्यात ४,२४० उमेदवारांनी सहभाग घेतला, मात्र अंतिम निकालात कोणीही यशस्वी ठरले नाही. एपीएस पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा २१ ते ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे, तसेच राखीव प्रवर्गासाठी नियमांनुसार सवलत लागू आहे. याशिवाय हिंदी टायपिंग आणि शॉर्टहँडमध्ये अपेक्षित वेग आवश्यक असून, संगणक ज्ञानासाठी ‘सीसीसी’ किंवा समकक्ष प्रमाणपत्र अनिवार्य आहे. संपूर्ण उमेदवार अपात्र ठरल्याने ३३१ पदे अजूनही रिक्त राहणार आहेत. या निकालामुळे परीक्षेच्या कठीणतेबाबत आणि प्रशिक्षणाच्या दर्जाबाबतही चर्चा सुरू झाली आहे.