बलुचिस्तानमध्ये पाक लष्कराच्या कारवाई १७ दहशतवादी ठार

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
बलुचिस्तान,
pak Operation in Balochistan पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी लष्कराने राबवलेल्या मोठ्या दहशतवादविरोधी कारवाईत १७ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) या लष्कराच्या माध्यम शाखेने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे करण्यात आली. मस्तुंग, नुश्की, केच आणि खुजदार या जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेत लष्कराने दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य केले. या कारवाईदरम्यान अनेक दहशतवादी जखमी झाल्याचेही सांगण्यात आले असून काहीजण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे समजते. त्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात अतिरिक्त शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
 

pak Operation in Balochistan 
 
आयएसपीआरच्या निवेदनानुसार, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तसेच त्यांच्या तळांवरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. हे दहशतवादी बलुचिस्तानमधील विविध दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रदेशात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून पुढील संभाव्य धोके लक्षात घेता लष्कर आणि सुरक्षा दलांकडून सतत देखरेख ठेवली जात आहे. बलुचिस्तानमधील अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, या मोहिमेमुळे दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.