कावागो,
Pakistani Mosque in Japan is Illegal जपानमधील कावागो शहरात बांधण्यात आलेली एक मस्जिद बेकायदेशीर ठरल्याने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर नामुष्कीचा सामना करावा लागत आहे. या मस्जिदीचे उद्घाटन यावर्षी एप्रिल महिन्यात जपानमधील पाकिस्तानी राजदूत अब्दुल हमीद यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र आता स्थानिक प्रशासनाने ही मशीद बेकायदेशीर बांधकाम असल्याचे स्पष्ट केले आहे. कावागो सिटी हॉलच्या माहितीनुसार, ही मस्जिद बांधताना आवश्यक प्रशासकीय परवानगी घेण्यात आलेली नव्हती. जपानमधील नगर नियोजन कायद्यानुसार धार्मिक इमारतींसाठी विशेष मंजुरी आवश्यक असते, जी या प्रकरणात पाळली गेली नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे मस्जिदवर कारवाईची मागणी वाढली असून ती पाडण्याबाबत विचार सुरू आहे.
वाद वाढताच पाकिस्तानच्या दूतावासाने या प्रकल्पापासून स्वतःला दूर केले आहे. १ जून रोजी जारी केलेल्या निवेदनात दूतावासाने स्पष्ट केले की, स्थानिक कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाशी त्यांचा संबंध नाही. तसेच पाकिस्तानी समुदायाने जपानमधील नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. दूतावासाने राजदूत अब्दुल हमीद यांच्या उद्घाटनातील सहभागावरही स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, सर्व कायदेशीर परवानग्या पूर्ण झाल्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच ते ३ एप्रिल रोजी कार्यक्रमात सहभागी झाले होते. मात्र नंतर ही माहिती चुकीची ठरल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. जपानमध्ये धार्मिक किंवा इतर कोणत्याही बांधकामासाठी स्थानिक सरकारची मंजुरी बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे संपूर्ण प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले असून पाकिस्तानला राजनैतिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.