मुंबई,
Possibility of stormy rain in Marathwada मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मान्सून पुढील २४ तासांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा प्रवास वेगाने होत असून, त्याच्या आगमनाची चाहूल स्पष्टपणे जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील ८ ते १० दिवसांत तो महाराष्ट्राच्या सीमांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे राज्यात लवकरच पावसाळ्याची सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यात आधीच मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असून अनेक भागांत वातावरणात बदल जाणवत आहे.

पुढील पाच दिवस राज्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मुंबई आणि पुण्यासह उपनगरांमध्येही पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे राज्यभरात उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र आता मान्सून जवळ आल्यामुळे आणि पावसाच्या सरी सुरू झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेपासून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.