वर्धा,
banana-growing-farmers : वर्धा जिल्ह्यात यंदा मे महिन्यात सलग अनेक दिवस ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या विक्रमी उष्णतेमुळे तसेच अलीकडे झालेल्या वादळी वार्यांमुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर वर्धा जिल्हा केळी उत्पादक संघाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन आर्थिक मदत करण्याची तसेच केळीचा समावेश पीक विमा योजनेत करण्याची मागणी केली.
निवेदनामध्ये उष्णतेची तीव्र लाट, वादळी वारे तसेच वादळानंतर अनेक भागांमध्ये खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले. केळी हे पूर्णपणे सिंचनावर अवलंबून असलेले पीक असल्याने अखंडित वीजपुरवठा नसल्यामुळे शेतकर्यांना वेळेवर सिंचन करता आले नाही. परिणामी पिकांवरील ताण वाढून नुकसानीची तीव्रता अधिक वाढली असल्याने केळी बागांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना विशेष आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तसेच आगामी काळात उष्णतेची लाट, वादळ, शीतलहरी, गरम वारे यांसारख्या हवामानविषयक आपत्तींचा समावेश करून केळी पिकासाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकार्यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच केळी उत्पादक शेतकर्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी व शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
यावेळी डॉ. सचिन पावडे, मनोज नागपूरे, सुभाष ताल्हन, कुणाल बैस, लोभेश वराडे, श्याम भेंडे, सचिन गरपाल, सचिन राऊत, तसेच केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.