कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप

वाठोडा पोलिस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर
 Nagpur ACB Raid भ्रष्टाचाराविरोधातील मोठ्या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) वाठोडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस उपनिरीक्षकाला लाच मागितल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रणाली बेनके यांच्यावर छेडछाड प्रकरणात कारवाई न करण्याच्या मोबदल्यात लाच मागितल्याचा आरोप आहे.
 
 
PSI Prasanna Benke, Wathoda Police Station Bribery Case, Nagpur ACB Raid,
छेडछाड प्रकरणात 30 हजारांची मागणी; तडजोडीनंतर 10 हजारांवर सहमती
ही लाचेची मागणी गेल्या तीन महिन्यांपूर्वीची असून आतापर्यंत पीएसआय प्रणाली बेनके या अचानक बेपत्ता झाल्या होत्या, त्या नागपुरात येताच त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात तत्कालिन ठाणेदार यांचीही ऑडिओ रेकॉर्डींग असून त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.एसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने एका महिलेने केलेल्या कामाचे कमिशन न दिल्यामुळे तिच्याविरोधात वाठोडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर संबंधित महिलेने तक्रारदाराविरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली. या प्रकरणात तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक प्रणाली बेनके यांनी एका खासगी व्यक्तीमार्फत 28 फेब्रुवारी 2026 रोजी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने गोपनीय पडताळणी सुरू केली. 6 मार्च 2026 रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. चौकशीदरम्यान संबंधित महिला अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांची मागणी केल्याचेही उघड झाले. नंतर चर्चेनंतर 10 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे एसीबीने नमूद केले आहे.मात्र, पुढे संबंधित महिला अधिकाऱ्यांना तक्रारदाराबाबत संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली नाही. तरीही लाचेची मागणी केल्याचे पुरेसे पुरावे मिळाल्याने एसीबीने मंगळवारी (2 जून) त्यांना ताब्यात घेतले.
 
 
त्यांच्या विरोधात वाठोडा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस उपअधीक्षक शुभांगी वानखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलिस निरीक्षक रविंद्र सहारे, पोलिस निरीक्षक वैशाली आठवले यांच्यासह एसीबीच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.नागरिकांना एसीबीचे आवाहननागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना एसीबीने आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने काम करणारा एजंट कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ तक्रार नोंदवावी. प्राप्त तक्रारींवर तातडीने कारवाई केली जाईल. तसेच सापळा कारवाईत वापरण्यात आलेली रक्कम एका महिन्याच्या आत परत केली जाईल आणि तक्रारदाराची वैध शासकीय कामे पूर्ण होण्यासाठीही मदत केली जाईल, असे एसीबीने स्पष्ट केले आहे.