पुणे
Railway Station Kidnapping पुणे रेल्वे स्थानक परिसरातून एका वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, पुणे शहर गुन्हे शाखा आणि बंडगार्डन पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अवघ्या १६ तासांत त्या चिमुकलीची सुखरूप सुटका करण्यात आली. या प्रकरणी दोन महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली असून, प्राथमिक तपासात बाल तस्करीच्या उद्देशाने अपहरण करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या शिवानी अमोल भोसले (वय २१) यांचा पतीसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी ३० मे रोजी घर सोडले होते. आपल्या एक वर्षाच्या मुलगी लीला हिला सोबत घेऊन त्या पुणे रेल्वे स्थानक परिसरात आल्या होत्या. राहण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांनी रेल्वे स्थानकातील आरक्षण कार्यालयाजवळील दत्त मंदिरासमोरील मोकळ्या जागेत रात्री मुक्काम केला.
रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास शिवानी भोसले यांना अचानक जाग आली. त्यावेळी त्यांच्या शेजारी झोपलेली मुलगी लीला दिसून आली नाही. घाबरलेल्या शिवानी यांनी परिसरात तिचा शोध घेतला, मात्र मुलगी कुठेच आढळून आली नाही. अखेर त्यांनी तातडीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने तीन विशेष पथके तयार करण्यात आली. तपास पथकाने ३० मे रोजी रात्री १० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत सलग १२ तास रेल्वे स्थानक आणि परिसरातील ७० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासादरम्यान एका पुरुषासह दोन महिला चिमुकलीला संशयास्पदरीत्या घेऊन जात असल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी अधिक Railway Station Kidnapping सखोल तपास केला असता, संबंधित संशयित चिमुकलीसह पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून सुटणाऱ्या पनवेल-नांदेड एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असल्याची माहिती समोर आली. यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) तसेच दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, बार्शी आणि लातूर येथील पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला.विशेष पोलिस पथक तत्काळ दौंडकडे रवाना करण्यात आले. ३१ मे रोजी दुपारी दौंड रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. द्रुपदा लक्ष्मण गायकवाड (३५), राधा आदिवासी (२०) आणि लकी आदिवासी (२१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.चौकशीदरम्यान आरोपींनी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून चिमुकलीचे अपहरण केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर मुलीची सुखरूप सुटका करून तिला पुण्यात आणण्यात आले आणि तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले.अवघ्या १६ तासांत पोलिसांनी दाखवलेल्या या धडाकेबाज कामगिरीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. आपल्या पोटच्या गोळ्याला पुन्हा सुरक्षितपणे मिठीत घेता आल्याने शिवानी भोसले यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. दरम्यान, चिमुकलीच्या सुटकेसाठी पोलिसांनी केलेल्या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.