आयपीएलच्या ट्रॉफीसोबत झळकली नागपूरची सई

‘देसी एलिगन्स’ने जिंकली जगभरातील मने

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Sai Mahakalkar, आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ऐतिहासिक विजयानंतरही सोशल मीडियावर एका तरुणीचीच सर्वाधिक चर्चा रंगली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यापूर्वी आयपीएल ट्रॉफी घेऊन मैदानात प्रवेश करणाऱ्या नागपूरच्या सई महाकाळकरने आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने, आत्मविश्वासपूर्ण वावराने आणि पारंपरिक भारतीय पेहरावाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.
 
 
Sai Mahakalkar, Nagpur Sai Mahakalkar, IPL Trophy Ceremony,
फायनलपूर्वी मैदानावर ट्रॉफी घेऊन केलेल्या दिमाखदार प्रवेशानंतर सोशल मीडियावर चर्चेचा विषय
आयपीएलच्या भव्य सोहळ्यात ट्रॉफी घेऊन मैदानावर आलेल्या सईचे फोटो आणि व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले. विशेष म्हणजे, आधुनिक ग्लॅमरच्या वातावरणात सईने ब्राऊन रंगाची पारंपरिक साडी परिधान करत भारतीय संस्कृतीची झलक सादर केली. तिच्या या आकर्षक आणि सोज्वळ लूकने देश-विदेशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.सई महाकाळकर ही सध्या गुजरातमधील बडोदा येथील पारुल विद्यापीठात फॅशन डिझाइनिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच मॉडेलिंग आणि डिजिटल कंटेंट क्रिएशन क्षेत्रातही ती सक्रिय आहे. आयपीएलच्या मंचावर मिळालेल्या या संधीमुळे तिच्या कारकिर्दीला नवी ओळख मिळाली आहे.
 
 
ऑडिशनमधून मिळाली सुवर्णसंधी
 
 
नागपुरात परतल्यानंतर सईने या अविस्मरणीय अनुभवाबद्दल सांगितले. तिच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आयपीएलच्या विशेष कार्यक्रमासाठी होणाऱ्या ऑडिशनची माहिती दिली होती. त्यानुसार तिने ऑडिशन दिले आणि अंतिम निवड झाली.“आयपीएलसारख्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ट्रॉफी घेऊन मैदानात प्रवेश करण्याची संधी मिळेल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते,” असे सईने सांगितले.
 
 

आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही ठसा
आयपीएलपूर्वीही सईने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला आहे. फिफा महिला विश्वचषकाच्या निमित्ताने ओडिशातील प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर परिसरात झालेल्या विशेष शूटिंगमध्येही तिने सहभाग नोंदविला होता. त्यामुळे मॉडेलिंग क्षेत्रातील तिचा आत्मविश्वास आणि अनुभव अधिक वृद्धिंगत झाला आहे.सई ही केवळ मॉडेल नाही, तर लोकप्रिय डिजिटल कंटेंट क्रिएटरदेखील आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ३० हजारांहून अधिक फॉलोअर्स असून ती लाइफस्टाइल, फॅशन आणि ब्युटीविषयक कंटेंट शेअर करते. तिच्या सर्जनशील व्हिडिओंना तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.आयपीएल फायनलनंतर नागपुरात परतलेल्या सईचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने जल्लोषात स्वागत केले. तिच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सरप्राइज सेलिब्रेशनमधील तिचा ग्लॅमरस अंदाजही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.भविष्यातील वाटचालीबाबत बोलताना सईने अभिनयापेक्षा डिजिटल कंटेंट क्रिएशन आणि फॅशन क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडील, भाऊ आणि शुभेच्छुकांना दिले.आयपीएलच्या जगमगाटात पारंपरिक साडीतील तिच्या आत्मविश्वासपूर्ण उपस्थितीने नागपूरच्या सई महाकाळकरने केवळ ट्रॉफीच नाही, तर लाखो भारतीयांची मनेही जिंकली आहेत.