देवळीत कालबाह्य खाद्यपदार्थांची विक्री

*चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ, प्रशासनाचे दुर्लक्ष

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
देवळी,
sale-of-expired-food-products : देवळी शहरात कालबाह्य पाकीटबंद खाद्यपदार्थांची सर्रास विक्री सुरू असून यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चिप्स, टकाटक तसेच विविध कंपन्यांचे पाकीटबंद खाद्यपदार्थ कालबाह्य झाल्यानंतरही दुकानांच्या समोर लटकून खुलेआम विक्रीसाठी ठेवले जात आहे. मात्र, एसपायरीच्या तारखांकडे लक्ष देण्यास दुकानदारांना वेळ नाही.
 
 
jkl
 
 
 
पाकीटबंद खाद्यपदार्थांचा सर्वाधिक वापर शालेय विद्यार्थी व लहान मुलांकडून केला जातो. चटकदार चवीमुळे मुले या पदार्थांकडे आकर्षित होतात, मात्र विक्रीपूर्वी एसपायरी तारीख तपासण्याची जबाबदारी असलेल्या दुकानदारांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, बाजार चौक परिसरातील एका दुकानातून ग्राहकाने चिप्सचे पॅकेट घेतल्यानंतर त्यावरील एसपायरी तारीख तपासली असता ती मार्च २०२६ मध्येच संपल्याचे दिसून आले. पण, विक्री मात्र जून २०२६ मध्ये करीत असल्याचे आढळून आले. कालबाह्य वस्तूंची दुकानातून विक्री करण्यात आल्याने ग्राहक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, शहरात अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे का, कालबाह्य वस्तूंची तपासणी कोण करणार, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.
 
 
अन्न व औषध प्रशासनाने तातडीने देवळी शहरात अशा कालबाह्य खाद्यपदार्थांची तपासणी करून कालबाह्य खाद्यपदार्थ जप्त करावे, अशी मागणी होत आहे.