वाहनचालकांना लक्ष्य करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
अहिल्यानगर,
inter-district-robbery-gang : समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडवून मारहाण करत लूटमार करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून तब्बल ९ लाख २८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
 

lutmar
 
 
 
अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये निखील बद्रीनारायण गोरे, शिवनाथ शांताराम आव्हाड, ओम बालाजी खरात, राहुल साधाकिसन कोकाटे आणि साईराज गणेश शहाणे यांचा समावेश आहे. हे आरोपी जालना, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील विविध भागांतील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
कोपरगाव तालुक्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी वाहनचालकांना लक्ष्य करून लूटमार केल्याच्या घटना समोर येत होत्या. याबाबत पोलिसांकडे तक्रारी आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तपासादरम्यान संबंधित टोळी जालना परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
 
चौकशीत या टोळीचा लूटमारीच्या घटनांशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण ९ लाख २८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
 
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे तसेच त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी मोहीम राबवली. या कारवाईमुळे समृद्धी महामार्गावरील वाहनचालकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.