सुरत,
Seven killed in ST accident गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बारडोलीजवळ धुळे- सुरत महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसमध्ये भीषण अपघात झाला. जोरदार धडकेनंतर एक बस पलटी होऊन लगेचच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या दुर्घटनेत ७ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अपघात इतका भीषण होता की, टक्कर झाल्यानंतर काही क्षणांतच एक बस रस्त्यावर उलटली आणि अचानक आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की बसमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली.

अपघातग्रस्त बसचे क्रमांक एमएच-18-बिझेड-1258 आणि MH-20-बीएल-3390 असे आहेत. एक बस धुळ्याहून नवापूर मार्गे सुरतच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसशी तिची जोरदार धडक झाली आणि अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच बारडोली अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, तर पोलिसांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले.या अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून काही जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी बारडोली रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघातानंतर धुळे–सुरत हायवेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.