नवी दिल्ली,
Split in Trinamool: 58 MLAs Break Away पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे. कोलकात्यात बुधवारी मोठी राजकीय घडामोड घडली असून ५८ टीएमसी आमदारांनी एकत्र येत विधानसभा सभापतींकडे महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर केला आहे. या ५८ आमदारांनी सादर केलेल्या प्रस्तावात त्यांनी स्वतःलाच ‘खरी तृणमूल काँग्रेस’ असल्याचा दावा केला असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रस्ताव पक्षातून काढून टाकण्यात आलेले नेते ऋतब्रता बंडोपाध्याय आणि संदीपन साहा यांच्या माध्यमातून सभापतींकडे सादर करण्यात आला.
या प्रस्तावात विरोधी पक्षनेते म्हणून ऋतब्रता बंडोपाध्याय आणि मुख्य प्रतोद म्हणून अख्रुझमान यांची नावे सुचवण्यात आली आहेत. अख्रुझमान हे माजी मंत्री असून या नव्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.या संपूर्ण वादाला सुरुवात काही आमदारांच्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याच्या आरोपांपासून झाली होती. ऋतब्रता बंडोपाध्याय आणि संदीपन साहा यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर विधानसभा सचिवालयाने गुन्हा नोंदवून तपास सीआयडीकडे सोपवला आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांनी संबंधित दोन्ही आमदारांवर पक्षविरोधी कारवाईचे आरोप करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यामुळे तणाव अधिक वाढला आहे. याआधीच तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी सभापतींकडे वेगळा प्रस्ताव सादर केला होता, ज्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी शोभनदेव चट्टोपाध्याय आणि मुख्य प्रतोदपदासाठी फिरहाद हकीम यांची नावे सुचवण्यात आली होती. यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष अधिक स्पष्ट झाला आहे.