आ. मुनगंटीवारांच्या सहकार्याने अनाथ मुलगा झाला पोलिस

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
चंद्रपूर, 
sudhir-mungantiwar : मूल तालुक्यातील गोलाभुज येथील रहिवासी खुशाल सुरेश गेडाम यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत नागपूर येथील कारागृह पोलिस शिपाई झाला असून, या यशामागे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची भावना खुशाल यांनी व्यक्त केली आहे.
 
 
jkl
 
 
 
खुशाल गेडाम यांचे वडील सुरेश गेडाम यांचे 2012 मध्ये निधन झाले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत 2014 मध्ये आईचेही निधन झाले. त्यावेळी खुशाल केवळ 9 वर्षांचा होता. आई-वडिलांच्या निधनामुळे त्याच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. मात्र, शिक्षण घेण्याची जिद्द त्याने कधीही सोडली नाही.
 
 
मोठ्या कष्टाने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणाचा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. आर्थिक अडचणींमुळे बीएचे शिक्षण घेणे कठीण झाले होते. खुशालची परिस्थिती लक्षात घेत आ. मुनगंटीवार यांनी तातडीने पुढाकार घेत सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना पत्र देऊन सिंदेवाही येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वस्तीगृहात त्याला प्रवेश मिळवून दिला. या एका निर्णयामुळे खुशालच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आणि त्याने आपले पदवी शिक्षण पूर्ण केले.
 
 
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खुशालने पोलिस दलात भरती होण्याचा निर्धार केला. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करीत त्याने सातत्याने मेहनत घेतली. त्याच्या अथक परिश्रमांना अखेर यश मिळाले आणि नागपूर येथे त्याची कारागृह पोलिस शिपाई म्हणून निवड झाली.
 
 
या यशानंतर खुशाल गेडाम यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर आयुष्य अंधारमय झाले होते. मात्र शिक्षणासाठी मिळालेल्या मदतीमुळे माझ्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. आज मी पोलिस दलात दाखल होऊ शकलो, यामागे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मोठे योगदान आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.