समुद्रपूर,
tanker-overturns-in-accident : सेवाग्राम ते शेडगाव चौरस्ता मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आज बुधवार ३ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बोथुडा फाट्याजवळ डिझेल भरलेला टँकर उलटला.
अपघातग्रस्त टँकरमधून डिझेलची गळती सुरू होताच लोकांनी गर्दी करीत मिळेल त्या साहित्याने डिझेलची लूट केली. मिळालेल्या माहितीनुसार, बोथुडा फाट्याजवळील बसस्थानक परिसरातून चंद्रपूर-आलापल्ली येथे एन. एल. ०१ ए. जे. ०४०१ क्रमांकाचा टँकर जात असताना टँकरचा मागील टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्यावरच उलटला. टँकरमधून डिझेल गळती होत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी बकेटांसह प्लॅस्टिक कॅन आणून डिेझेलची लूट केली. घटनेची माहिती मिळताच बोथुडा येथील पोलिस पाटील गोपाल किरपाल यांनी घटनास्थळी भेट देऊन हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक सोनकुसरे, दिलीप पवार, कुंभरे, किशोर गाडेवा, स्वप्नील निखुरे यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण आणले. या घटनेत चालक व वाहक दोघेही किरकोळ जखमी झाले. या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली आहे.