पंकज नौनुरवार,
अहेरी,
tej-kumar-bandiwar : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अशक्य वाटणार्या गोष्टीही साध्य करता येतात, हे अहेरी राजनगरीतील एका तरुणाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अहेरी राजनगरीचे सुपुत्र तेजकुमार सत्यनारायण बंडीवार यांची भारतीय हवाई दलात ‘प्रथम श्रेणी अधिकारी’ म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या उत्तुंग आणि ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण अहेरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तेजकुमार यांचे प्राथमिक ते उच्च शिक्षण अहेरी येथेच झाले असून त्यांनी बी. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. घरची परिस्थिती आणि जबाबदार्या सांभाळत त्यांनी मिळवलेले हे यश आजच्या तरुण पिढीसाठी नवा आदर्श ठरत आहे. आई-वडिलांच्या सेवेसोबतच कर्तव्याला न्याय देता येतो हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
दैनिक तरुण भारतच्या प्रतिनिधीसोबत खास बातचीत दरम्यान तेजकुमार म्हणाले, माझे शिक्षण अहेरी येथेच राहून बी.ए. पर्यंत झाले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मला कुठेही बाहेर जाण्याची गरज भासली नाही. घरात राहून, आई सुनीता आणि वडील सत्यनारायण बंडीवार यांची सेवा करत मला माझे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करता आले, यापेक्षा माझ्यासाठी मोठा आनंद काय असू शकतो, असे ते म्हणाले.
लहानपणापासूनच देशाच्या संरक्षणाचे आणि आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहणार्या तेजकुमार यांची ही निवड केवळ एका कुटुंबाचा आनंद नसून, संपूर्ण ग्रामीण भागातील तरुण पिढीसाठी एक नवा आशेचा किरण ठरली आहे. संकटांवर मात करत, योग्य दिशा आणि अपार मेहनत घेतली तर देशाच्या सर्वोच्च सेवेत मानाचे स्थान मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा हा करारी बाणा आणि आत्मविश्वास इतर विद्यार्थ्यांनाही देशसेवेची प्रेरणा देणारा ठरेल यात तीळमात्र शंका नाही.
अहेरी परिसरातील थोर व्यक्ती, तरुण आणि सुजाण नागरिकांकडून तेजकुमार बंडीवार यांचे भारतीय हवाई दलातील या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आणि देशसेवेच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
मोठ्या शहरांना दिला फाटा, ‘सेल्फ स्टडी’वर भर
अनेक तरुण स्पर्धा परीक्षा किंवा आपल्या स्वप्नांच्या तयारीसाठी नागपूर, पुणे किंवा मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन महागड्या अकॅडमीत प्रवेश घेतात. मात्र, तेजकुमार यांनी कोणत्याही क्लासचा आधार न घेता, अहेरी येथेच राहून संपूर्ण अभ्यास केला. केवळ स्वतःच्या कष्टावर (सेल्फ स्टडी) आणि नियोजित अभ्यासाच्या जोरावर त्यांनी भारतीय हवाई दलाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि खडतर परीक्षेत हे घवघवीत यश प्राप्त केले, हे या यशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये ठरले आहे. अहेरी सारख्या दुर्गम भागात राहूनही केवळ स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी हा टप्पा गाठला.