अकरावीची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात

*२ हजार ८१३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
वर्धा,
class-11-admission-process : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू असून आतापर्यंत २ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. कोटा व सीएपी राऊंड अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी सुरू करण्यात आलेली केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (सीएपी) आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिल्ह्यातील १३३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
 
 
jkl
 
 
 
विद्यार्थ्यांनी भाग-१ (नोंदणी) आणि भाग-२ (महाविद्यालयांचा पसंतीक्रम) पूर्ण करून ऑनलाइन अर्ज केले होते. पहिल्या प्रवेश फेरी अंतर्गत ३१ मे पर्यंत २ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. यापैकी २ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे (सीएपी राऊंड) तर १६७ विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश घेतला आहे.
 
 
यंदा जिल्ह्यात दहावीची परीक्षा १३ हजार २१८ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण केली तर अकरावीमध्ये विविध शाखांसाठी २३ हजार ३०० जागा उपलब्ध आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेच्या ९ हजार ३००, वाणिज्य शाखेच्या २ हजार ५६०, कला शाखेच्या ९ हजार ६८० आणि व्यावसायिक (व्होकेशनल) शाखेच्या १ हजार ७६० जागांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या तुलनेत जागा पुरेशा असल्या तरी बहुतेक विद्यार्थी आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात आणि शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याने प्रवेश प्रक्रियेत स्पर्धा वाढली आहे.