आमगावच्या दमाहे कुटूंबावर काळाचा घाला

- पर्यटनासाठी जात असताना प्रवासी बसची कारला धडक - पत्नीचा मृत्यू पती व मुले जखमी

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
आमगाव, (गोंदिया),
accident amgaon येथील पेंट्स दुकानाचे संचालक निमेश दमाहे हे कुटूंबीयांसह मध्यप्रदेशातील कान्हा नॅशनल पार्क येथे पर्यटनाला जात असताना मध्यप्रदेशातील बालाघाट-बैहर मार्गावरील लौगर घाटीत एका प्रवासी बसने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने निमेश यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर निमेश व त्यांची मुले गंभीर जखमी झाल्याची घटना आज, बुधवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास घडली. दुर्गा निमेश दमाहे (33) असे मृत पत्नीचे नाव आहे. यश निमेश दमाहे (10) व रुचिता निमेश दमाहे (6 ) अशी जखमी मुलांची नावे आहे.
 
 

आमगावच्या दमाहे कुटूंबावर काळाचा घाला 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार निमेश दमाहे यांनी कुटूंबासह मध्यप्रदेशातील कान्हा नॅशनल पार्क येथे पर्यटनाला जाण्याचा बेत आखला. त्यानुसार आज, बुधवारी सकाळी निमेश त्यांची पत्नी दुर्गा व दोन्ही मुले सकाळी 10 वाजताच्या सुमारास स्वतःच्या चारचाकी वाहन क्रमांक सीजी 04 पीए 7017 ने कान्हा अभयारण्याला भेट देण्यासाठी निघाले. प्रवास सुरू असताना बालाघाट- बैहर मार्गावर असलेल्या लौगर घाट परिसरात विरुद्ध दिशेने येत असलेल्या प्रवासी बस क्रमांक एमएपी 50 पी 0287 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत दुर्गा दमाहे यांचा जागीच मृत्यू झाला.accident amgaon तर निमेश व त्यांची दोन्ही मुले यश व रुचिता हे जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी बालाघाट येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्गा दमाहे ह्या लोधी समाज सेवा समितीच्या संचालिका होत्या. तर निमेश दमाहे हे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय पदाधिकारी असून त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा, आमगाव तालुका अध्यक्ष म्हणून सलग दोन कार्यकाळ जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते भारतीय जनता पक्षाच्या आमगाव शहर सचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या दुःखद प्रसंगामुळे भाजप परिवारासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.