दोन अत्मासमर्पित माओवादी अडकले ‘विवाह बंधनात’

- गोलू आणि संगीताची नव्या आयुष्याकडे वाटचाल

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
गोंदिया,
surrendered maoists शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणाच्या यशाचे जिवंत उदाहरण देत दोन आत्मसमर्पित सी.पी.आय. (माओवादी) नक्षल सदस्य विवाह बंधनात अडकले आणि शांततामय, सन्माननीय जीवनाची त्यांनी नवी सुरुवात केली. गोलू व संगीता अशी त्या आत्मसमर्पित नक्षल सदस्यांची नावे असून गोंदियाचे पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या संकल्पनेतून, तसेच प्रभारी पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी 31 मे रोजी परिवर्तन आणि नव्या जीवनप्रवासाचे प्रतिक ठरणारा एक हृदयस्पर्शी व प्रेरणादायी विवाह सोहळा गोंदियाच्या कारंजा येथील पोलिस मुख्यालयात पार पडला.
 
 

surrendered maoists 
 
 
अलीकडील काळात गोंदिया जिल्ह्यात 15 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असता त्यांना गोंदियाच्या कारंजा येथील पोलिस मुख्यालयातील पोलिस वसाहतीत ठेवण्यात आले आहे. या आत्मसमर्पित सदस्यांपैकीच पांडू पुसू वड्डे ऊर्फ गोलू रा. तिरलागड, ता. पखांजूर, जि. कांकेर (छत्तीसगड) आणि सैवंती रायसिंग पंधरे ऊर्फ संगीता रा. राशीमेटा, ता. बैहर, जि. बालाघाट (मध्यप्रदेश) या दोघांनी आजन्म सोबत राहण्याची विवाह गाठ पोलिस मुख्यालयात बांधली. त्यांच्या या लग्न सोहळ्यास पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी मंजुरी देत मुख्यालयातच त्यांचे लग्न लावून दिले. पांडू पुसू वड्डे हा माओवादी संघटनेत गोलू या नावाने ओळखला जात होता. तो सीपीआय (माओवादी) संघटनेत दर्रेकसा एरियामध्ये डिव्हिजनल कमिटी सदस्य म्हणून तर सैवंती रायसिंग पंधरे ही माओवादी संघटनेत संगीता या नावाने ओळखली जात असताना दरेकसा एरिया कमिटीमध्ये एरिया कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होती. अनेक वर्षे हिंसाचार, संघर्ष आणि अनिश्चिततेच्या वातावरणात जीवन व्यतीत केल्यानंतर या दोघांनीही गेल्या वर्षी 28 नोव्हेंबर रोजी गोंदिया पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण केले. समाजात सन्मानाने जगण्याची, स्वतःचे कुटुंब उभे करण्याची आणि शांततामय भविष्य घडविण्याची त्यांची ईच्छा या निर्णयामागे होती.surrendered maoists दरम्यान, कुटुंबीय, नातेवाईक, स्थानिक नागरिक आणि पोलिस अधिकारी/अंमलदार यांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह सोहळा पार पडला. नवजीवनाची, स्वीकाराची आणि सामाजिक पुनर्स्थापनेची सुंदर अनुभूती या सोहळ्याने यावेळी सर्वांना दिली.
इतर माओवाद्यांना संदेश..
हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केल्यास सन्मानाने, सुरक्षिततेने आणि आनंदाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध आहे. प्रत्येक व्यक्तीला नव्याने उभे राहण्याची आणि समाजात आपले स्थान निर्माण करण्याची दुसरी संधी मिळू शकते, हा विश्वास या घटनेने अधिक दृढ केला असून या विवाह सोहळ्यामुळे अद्याप जंगलात कार्यरत असलेल्या माओवादी सदस्यांना एक सकारात्मक संदेश मिळला आहे.
हा विवाह केवळ एक सामाजिक कार्यक्रम नसून परिवर्तन, पुनर्मिलन, विश्वास आणि शांततामय भविष्याच्या आशेचा उत्सव आहे.
- गोरख भामरे, पोलिस अधीक्षक, गोंदिया