तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
uday-navlekar : सुप्रसिद्ध कवी, गझलकार कविवर्य सुरेश भट यांच्या साहित्यविश्वाला समर्पित ‘सुरेश भट : शब्दांच्या पलीकडे’ या माहितीपटाचे प्रभावी सादरीकरण निर्माते प्राचार्य डॉ. उदय नावलेकर यांनी उत्साहपूर्ण वातावरणात केले.
शब्दांचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाèया सुरेश भट यांच्या संवेदनशील, वास्तवदर्शी आणि हृदयस्पर्शी कवितांचा जीवनपट डॉ. उदय नावलेकर यांनी आपल्या प्रभावी वाणीमधून रसिकांसमोर उलगडला. भटांच्या कविता व गझल सर्वसामान्य रसिकांनाही सहज समजतील अशा पद्धतीने मांडण्यात आल्या. कार्यक्रमातील प्रत्येक दृश्य, निवेदन व सादरीकरणातून घेतलेली प्रचंड मेहनत स्पष्टपणे जाणवत होती. उपस्थित प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले होते.
एका रसिकाने प्रतिक्रिया देताना म्हटले की, कविवर्य सुरेश भट यांना खèया अर्थाने न्याय मिळाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तर दुसèया एका रसिकाने भावनिक शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, ‘खरंच अमृताचीच रात्र बरसून गेली.’
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सीए प्रकाश चोपडा यांनी आपल्या मनोगतात, मराठी गझलांची सुरुवात यवतमाळमध्ये भाऊसाहेब पाटणकर यांनी केली आणि त्या गझलांना शिखरावर पोचवण्याचे कार्य कविवर्य सुरेश भट यांनी केले. प्राचार्य डॉ. उदय नावलेकर यांची कलाकृती अत्यंत कल्पक असल्याचे सांगितले.
जयंत कर्णिक यांनी, डॉ. उदय नावलेकर यांचे निवेदन, भाषाशैली व सादरीकरण मनाला खूपच भावले, असे सांगून, प्राचार्यपदाची प्रशासकीय जबाबदारी सांभाळत साहित्य क्षेत्रातील व्यक्तींवर अतिशय धाडसाने प्रकल्प हातात घेऊन त्याला न्याय देण्याचे कार्य डॉ. नावलेकर सातत्याने करीत असल्याचे म्हटले.
या माहितीपटाच्या माध्यमातून सुरेश भट यांचे वेदनादायी पण सर्जनशील आणि प्रेरणादायी जीवन नव्या पिढीसमोर प्रभावीपणे उभे राहिले. कार्यक्रमानंतर अनेक रसिकांनी डॉ. उदय नावलेकर यांचे अभिनंदन करत हीच सुरेश भटांना खरी आदरांजली असल्याची भावना व्यक्त केली.
या व्हिडिओ संपादनासाठी डॉ. आदित्य नवग्रहे, युवराज पाटील, चेतन बोधे व प्रीतम यांनी मदत केली. आयोजनामध्ये प्रा. डॉ. रहाटे, प्रा. डॉ. वाडीवे, प्रा. डॉ. सामृतवार, विरूळकर, कार्लेकर व साजिद यांचे योगदान लाभले.