विप्लव बाजोरिया निकाल पत्राच्या प्रतीक्षेत

मागणीसाठी झाला वाद, पिता पुत्रावर गुन्हा दाखल

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
अमरावती,
viplav bajoria विधान परिषदच्या अमरावती निवडणुकीत शिंदे सेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा नामांकन अर्ज काल अवैध ठरवून बाद करण्यात आला होता. या निर्णयाच्या निकालाची प्रत त्यांना अद्याप मिळाली नसल्यामुळे त्यांचा उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग खोळंबला आहे. दरम्यान, विप्लव व त्यांचे वडील गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गाडगेनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

विप्लव बाजोरिया  
 
 
उमेदवारी अर्जावरील आक्षेपांच्या सुनावणीमध्ये विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. यावेळी बाजोरिया निर्णयाची प्रत मागायला रात्री परत जिल्हाधिकारी कार्यालयात आले. तेव्हा त्यांनी वाद घालत आक्षेपार्ह भाषा वापरली तसेच प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यात आल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. या घटनेनंतर निवासी जिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे मंगळवारी रात्री 1 वाजता माजी आमदार विप्लव बाजोरिया, त्याचे वडील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.viplav bajoria उमेदवारी अर्जावरील वाद आधीच चर्चेत असताना आता बाजोरिया पिता-पुत्रावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
हो, हा गुन्हा मी केला : बाजोरिया
निवडणूक अर्जावर निकाल देण्याचा अधिकार जसा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा आहे, तसाच या निकालाची प्रत मागण्याचा अधिकारही माझा आहे. या निर्णयाला मला उच्च न्यायालयात आव्हान द्यायचे आहे. मला अजूनही निकालाची प्रत मिळालेली नाही. निकालाची प्रत मागणे गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केला आहे, असे विप्लव व गोपीकिशन बाजोरिया यांनी सांगितले.