यवतमाळात विप आखाड्यातून मविआची ‘माघार’

महायुती अविरोध विजयाकडे : अपक्ष उमेदवारांकडे लक्ष

    दिनांक :03-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
election : यवतमाळ जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक आखाड्यातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी संख्याबळ जुळत नसल्याचे कारण सांगून माघार घेतली आहे. त्यामुळे आता या विधान परिषद निवडणूक रिंगणात महायुतीसह तीन अपक्ष उमेदवार सध्या रिंगणात आहेत. त्यांचे ‘जुळल्यास’ येथील निवडणूक अविरोधही होऊ शकते.
 
 
k
 
 
या विधान परिषद निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीची थेट लढत होती. मात्र, काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आपला विजय होण्याची शक्यता नसल्याचे सांगून नामांकन मागे घेतले. त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.
 
 
भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनीही आपले नामांकन दाखल केले आहे. त्यांचा अर्ज अपक्ष म्हणून रिंगणात कायम आहे. त्यामुळे भुतडा गुरुवार, 4 जून रोजी आपले नामांकन मागे घेणार का, याकडे सर्वांचे लागले आहे. त्यांनी नामांकन मागे घेतल्यास महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय निश्चित होणार असल्याचे राजकीय वर्तुळाचे मत आहे.
काँग्रेसला पाडले तोंडावर..!
 
 
मविआचे काँग्रेसी उमेदवार साहेबराव कांबळे यांनी स्वत:च जोरदार फिल्डिंग लावून ही उमेदवारी मागितली होती. त्यावेळी या मतदारसंघातील मतदारांची संख्या किती आहे, त्यात आपली, आपल्या पक्षाची, महाविकास आघाडीची नेमकी स्थिती काय आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. तरीही आपल्या ‘वैयक्तिक ताकदीचा’ विचार करून त्यांनी ही निवडणूक लढण्यात उत्साह दाखवला असावा. साहेबराव कांबळे यांनी उमरखेडहून गेली विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढून पराभव स्वीकारला असल्यामुळे त्यांना निवडणूक लढण्याचा अनुभव होताच. पण या निवडणुकीचे ‘अर्थकारण’ कदाचित उशीरा कळल्यामुळे लढण्याची हिंमत जिरून त्यांनी शरणागती पत्करली असावी, असे दिसते.
नवीन अध्यक्षांचाही विश्वासघात
 
 
बुधवार, 3 जून रोजी साहेबराव कांबळे यांनी जिल्हा कचेरीत चुपचाप येऊन, आपल्या काँग्रेस पक्षाला कोणतीही कल्पना न देता उमेदवारी परत घेतली. या घटनाक्रमाने काँग्रेससह महाविकास आघाडी आणि प्रसार माध्यमांनाही धक्काच बसला. पुसदचे अ‍ॅड. सचिन नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांच्या हातून होणारे हे पहिलेच ‘कार्य’ असताना कांबळे यांनी त्यांनाही तोंडघशी पाडले. त्यामुळे अ‍ॅड. नाईक यांनीही संतप्त प्रतिक्रिया देत विश्वासघाताचा थेट आरोप करून कांबळे यांच्या काँग्रेसमधून हकालपट्टीची मागणी केली आहे.