बंगळूर,
actress molested in bengaluru बंगळूरमध्ये मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर बिग बॉस कन्नड फेम अभिनेत्री दिव्या सुरेश पुन्हा चर्चेत आली आहे. रविवारी रात्री शहरातील रस्त्यावर चालत असताना एका अनोळखी व्यक्तीकडून छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप तिने केला असून, या घटनेचा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर करत शहरातील महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय दिव्या सुरेश तिच्या चुलत बहिणीसोबत रात्री सुमारे ११:३० वाजता गाडीकडे जात असताना हा प्रकार घडला. तिच्या म्हणण्यानुसार, एका अनोळखी व्यक्तीने तिचा पाठलाग करत सार्वजनिक ठिकाणी अयोग्य आणि अश्लील वर्तन केले. तिने विरोध करूनही संबंधित व्यक्ती थांबला नाही आणि ती गाडीत बसल्यापर्यंत त्याने पाठलाग सुरूच ठेवला, असा आरोप दिव्याने केला आहे.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही तिने रेकॉर्ड केल्याचे सांगितले जात असून, सोशल मीडियावर तिने थेट बंगळूर पोलिसांना टॅग करत “महिलांची सुरक्षा खरंच कुठे आहे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. केवळ रात्री बाहेर असल्यामुळे महिलांना अशा प्रकारच्या अनुभवांना सामोरे जावे लागणे चुकीचे असल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. दिव्या सुरेश मनोरंजन क्षेत्रातील परिचित नाव असून तिने मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंतचा प्रवास केला आहे.
२०१७ मध्ये तिने ‘मिस इंडिया साऊथ’ हा किताब जिंकला होता आणि त्यानंतर तिने चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम केले आहे. ‘बिग बॉस कन्नड सीझन ८’ मधील सहभागामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. दरम्यान, याआधीही दिव्या सुरेश एका हिट-अँड-रन प्रकरणामुळे वादात आली होती. २०२५ मध्ये बंगळूरच्या बायतरयानपुरा परिसरात झालेल्या अपघातात काही जण जखमी झाले होते आणि सीसीटीव्ही तपासानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा एका नव्या प्रकरणामुळे ती चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.