अनिल कांबळे,
नागपूर,
murdered-in-gang-war : गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळीयुद्धातून एका युवकाचा सात ते आठ आरोपींनी धारदार शस्त्राने खून केला. ही घटना सोमवारी सायंकाळी फुटाळा परिसरात घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरात गँगवॉर भडकण्याची चिन्हे दिसत आहेत. अमन शेख असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर योगेंद्र ऊर्फ लाला पांडे, जंगली पांडे अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. अमन हा कुख्यात गँगस्टर शेखू याचा भाचा असल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे कुख्यात लाला पांडे आणि जंगली पांडे हे गुन्हेगारांच्या टोळीचे म्होरक्या आहेत. सोमवारी फुटाळा तलाव परिसरातील मयूर जाधव नावाच्या युवकाच्या दुकानावर लाला पांडे बसला होता. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तेथे अमन शेख आला. त्याने मयूरला दमदाटी केली. त्यामुळे लाला पांडेने त्याला रोकले. अमनने लालाच्या दोन कानशिलात लावल्या. लालाने अमनला धमकी देऊन तेथून निघून गेला. काही मिनिटांनी लाला हा त्याचा भाऊ जंगली पांडे आणि त्यांचे सहा साथिदारांसह फुटाळ्यावर पोहचला. अमन शेखला घेराव घालून चाकू आणि तलवारीने हल्ला केला. अमन जीव वाचविण्यासाठी पळायला लागला. आरोपींनी त्याचा पाठलाग करुन खून केला. हा सर्व प्रकार घडेपर्यंत फुटाळा परिसरात एकही पोलिसांचे वाहन, बीट मार्शल किंवा गस्त घालणारे पोलिस कर्मचारी फिरकले नाही. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अमनच्या हत्याकांडामुळे गिट्टीखदान परिसरात पुन्हा एकदा गँगवॉर भडकण्याचे चित्र दिसत आहे.