हिंगणघाट,
bharat-vidyalayas-admission-ceremony : मुलांच्या किलबिलाटाने आज मंगळवार ३० रोजी भारत विद्यालयाचा परिसर फुलून गेला. नव्या स्वप्नांचा, नव्या उमेदीचा साक्षीदार ठरला. ढोल-ताशांच्या निनादात आणि बॅण्ड पथकाच्या तालावर शाळेचा परिसर दुमदुमून गेला. शिक्षकांनी शाळा सजवली. प्रवेशद्वारावर भव्य प्रवेशद्वार उभारले होते. रांगोळी काढण्यात आली होती. फुलांसोबतच आंब्यांच्या पानांचे तोरण लावण्यात आले होते. रंगीबेरंगी फुग्यांनी सजलेल्या शाळेत बालमनं हरखून गेली. पाचवी व सहावीमधील नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत बॅण्ड पथकासह ढोल-ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढून करण्यात आले.
मुख्याध्यापक हरीश भट्टड, उपमुख्याध्यापक मनीषा कोंडावार, पर्यवेक्षक नीलाक्षी बुरीले, सिंधू नंदनवार, पालक प्रतिनिधी नंदकिशोर माहुरे व अश्विनी वावधने यांनी औक्षवण केले. पहिले पाऊल टाकणार्या मुलांना टिळा लावून, गुलाब पुष्प देऊन सरस्वतीच्या मंदिरात स्वागत केले. वेलकम सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. मुख्याध्यापक हरीश भट्टड, उपमुख्याध्यापिका मनीषा कोंडावार यानी पालकांशी संवाद साधला. संचालन निकीता कामडी यांनी केले तर उपमुख्याध्यापक मनीषा कोंडावार यांनी आभार मानले.