थरारक कारवाईत १७ गोवंशांना जीवदान

गोरक्षकांच्या माहितीवरून पोलिसांचा पुढाकार

    दिनांक :30-Jun-2026
Total Views |
धामणगाव रेल्वे,
cattle-saved : गोरक्षक आणि पोलिसांनी संयुक्त सतर्कता दाखवत मंगरुळ दस्तगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोवंश तस्करीचा एक मोठा डाव उधळून लावला आहे. गोरक्षकांकडून मिळालेल्या अचूक गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या नाकेबंदीदरम्यान, तस्करांच्या दोन भरधाव वाहनांनी पोलिसांना हुलकावणी देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. या थरारक पाठलागादरम्यान तस्करांच्या गाड्यांचे भीषण अपघात झाले, ज्यामध्ये २ गोवंश जागीच ठार झाले तर १७ जनावरांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.
 
 
 
k
 
 
 
माहितीनुसार, ३० जून रोजी पहाटेच्या सुमारास विटाळा रोडवरून टाटा योद्धा आणि महेन्द्रा मॅक्स या दोन गाड्यांमधून मोठ्या प्रमाणावर गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक केली जाणार असल्याची खात्रीशीर माहिती गोरक्षकांनी पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिस अधिकारी गजानन डवरे यांनी आपल्या पथकासह तात्काळ विटाळा रोडवर सापळा रचला. एमएच ४० बिडी ५६८६ क्रमांकाची टाटा योद्धा आणि एम एच ४९ बी झेड ५६७१ क्रमांकाची महेन्द्रा मॅक्स या दोन्ही गाड्या येताना दिसल्या. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांना पाहताच तस्करांनी गाड्यांचा वेग वाढवून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग सुरू करताच तस्करांनी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील पीएचसीच्या अरुंद रस्त्यावर गाड्या घातल्या.
 
 
तेथे टाटा योद्धा गाडीने प्रवीण चौधरी यांच्या मालकीच्या उभ्या असलेल्या टाटा एस -एम एच २७ डीटी ०८०५ गाडीला भीषण धडक दिली. महेन्द्रा मॅक्स गाडी थेट डॉ. महल्ले यांच्या घराचा सज्जा तोडून वीजेच्या पोलला धडकली आणि नाल्यात अडकली. अपघाताचा थरार घडवून दोन्ही वाहनांचे चालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी गाड्यांची तपासणी केली असता, जनावरांचे पाय आणि तोंड दोरीने अत्यंत निर्दयीपणे बांधून त्यांना आत कोंबण्यात आले होते. टाटा योद्धा गाडीतील ९ जनावरांपैकी १ गोरा ठार झाला, तर ८ जनावरे जखमी होती. महेन्द्रा मॅक्स गाडीतील १० जनावरांपैकी १ बैल ठार झाला, तर ९ जनावरे जखमी होती. सर्व जखमी जनावरांवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ उपचार करण्यात आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्व १७ गोवंशांना सुरक्षेसाठी पोलिसांच्या मदतीने श्री गौरक्षण संस्था, धामणगाव रेल्वेच्या स्वाधीन करण्यात आले. या धडक कारवाईत पोलिसांनी २ गाड्या आणि जनावरांसह एकूण १९ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फरार आरोपी चालक व मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.