नवी दिल्ली,
change in Team India against England इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या संभाव्य पदार्पणामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आयर्लंड दौऱ्यात दोन्ही सामने बेंचवर बसल्यानंतर आता इंग्लंडविरुद्ध त्याला संधी मिळण्याची शक्यता अधिक मजबूत मानली जात आहे.वैभव सूर्यवंशीला सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते, अशी चर्चा रंगली आहे. खराब फॉर्ममुळे संजू सॅमसनचे स्थान सध्या धोक्यात आले आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांत संजूला केवळ ५ धावाच करता आल्या, तर एका सामन्यात तो गोल्डन डकवर बाद झाला. त्यामुळे संघ व्यवस्थापन बदलाचा विचार करू शकते.

यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनची कामगिरीही अपेक्षेनुसार झाली नाही. आयर्लंड मालिकेतील दोन सामन्यांत त्याने फक्त १३ धावा केल्या. त्यामुळे प्लेइंग-11 मधील त्याच्या स्थानाबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे.दरम्यान, जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या टी-20 फलंदाज अभिषेक शर्माकडून पुन्हा एकदा स्फोटक सुरुवातीची अपेक्षा आहे. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने केवळ २० चेंडूत ४९ धावांची आक्रमक खेळी करत आपल्या फॉर्मची झलक दाखवली होती. कर्णधार श्रेयस अय्यरसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कर्णधारपद स्वीकारल्यानंतर सुरुवातीचे दोन टी-20 सामने गमावल्यानंतर आता इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून संघाला पुन्हा विजयाच्या मार्गावर आणण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर आहे.अष्टपैलू सूर्यांश शेडगेने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पदार्पण केले होते. मात्र, फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत तो विशेष प्रभाव पाडू शकला नाही. तरीही संघ व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास कायम ठेवण्याची शक्यता आहे.
उपकर्णधार अक्षर पटेलवर मधल्या फळीत स्थिरता आणण्याची तसेच फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असेल. वेगवान गोलंदाजी विभागात हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव यांच्यावर नव्या चेंडूने सुरुवातीलाच विकेट्स मिळवण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन अशी असू शकते — अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, सूर्यांश शेडगे, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव.