अमरावती,
floods-in-megha-river : चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा स्थित मेघा नदीला २९ जूनला रात्री १० च्या सुमारास अचानक आलेल्या पुरामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. त्यात दोघे वाहून गेले.
मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील सातपुडा पर्वतरांगेत झालेल्या पावसामुळे मेघा नदीला आलेल्या पुरातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. शिरसगाव मंडळात सतत तीन तास झालेल्या पावसामुळे नदीलगतच्या बाझी नाल्याला सुद्धा पाणी आल्याने ते संपूर्ण पाणी आठवडी बाजार परिसरातील दुकानांमध्ये शिरून हजारोंचे नुकसान झाले. नाल्याच्या पाण्याने मार्ग बदलवून संरक्षण भिंत तोडून प्रवाह बदलविला. शिरसगाव-परतवाडा मार्गावर चार तास वाहतूक ठप्प झाली होती. गावातील वीज चार तास बंद होती. अखेर रात्रीच्या अंधारात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती करून वीजसेवा सुरळीत केली. शिरसगाववरून पांढरी गावी जात असताना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने पांढरी येथील दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेले. रवींद्र रामभाऊ आवारे यांचा मृतदेह शोधण्यात डीडीआरएफ टीमला यश आले. गोपाल निर्वार यांना शोधण्याचे कार्य सुरू आहे.